

सांगली : दिवंगत माजी आमदार विलासराव शिंदे यांची नात तसेच वाळवा पंचायत समितीचे माजी उपसभापती वैभव शिंदे व भाग्यश्री शिंदे यांची कन्या वैष्णवी शिंदे हिने महिला क्रिकेटमध्ये अल्पावधीतच चमकदार कामगिरी करत आपले नाव उंचावले आहे. पुणे वॉरियर्स लीगमध्ये खेळताना विशेषत: यष्टीरक्षणात चमकदार कामगिरी करून वैष्णवी शिंदे-मानकर हिने क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा वाढवल्या आहेत.
वैष्णवीने दहावीनंतर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तिच्यातील कौशल्या लक्षात घेऊन प्रशिक्षक अनिल जोब यांनी प्रशिक्षण देऊन तिला यष्टीरक्षक होण्याचा सल्ला दिला. पुढे 19, 23 वर्षांखालील महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघामध्येसुद्धा तिची निवड झाली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाकडून खेळताना सलग चार वर्षे कर्णधार म्हणून कामगिरी तिने केली. याच दरम्यान, सामना खेळत असताना तिला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे जवळपास वर्षभर थांबावे लागले. तसेच कोरोनामुळे दोन वर्षे थांबावे लागले. बंधू वरदराज, भगिनी डॉक्टर विश्वजा तसेच पती पृथ्वीराज मानकर यांचीही तिला साथ मिळत आहे. वैष्णवीने प्रशिक्षक चेतन पडियार यांच्याकडे प्रशिक्षणास सुरुवात केली. याच दरम्यान, राज्य क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय बजाज यांनीही मार्गदर्शन केले. महाराष्ट्र महिला संघामध्ये तिची 2024 मध्ये यष्टीरक्षक तसेच फलंदाज म्हणून निवड झाली. सांगली जिल्हा महिला क्रिकेट संघाची ही कर्णधार म्हणून तिने कामगिरी बजावली. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी क्रिकेट मॅचेस खेळल्या. या सामन्यांत चांगली कामगिरी केली.
यामुळे नुकत्याच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग मधल्या पुणे वारीयर्स या संघामध्ये तिची निवड झाली. यात झालेल्या सात सामन्यांमध्ये सात ही सामने जिंकले. पुणे वॉरियर संघाने चॅम्पियनशिप मिळवली. झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये पुणे वॉरियर्स संघ विरुद्ध सोलापूर समशेर संघामध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला. यामध्येही अतिशय चांंगले यष्टीरक्षक करून तिने सर्वांची मने जिंकली. अनेकांनी तिचे कौतुक केले. जिल्ह्यातील मुलगी आज एवढ्या मोठ्या पातळीवर महिला संघात क्रिकेट खेळत आहे. या सार्याच कामगिरीबद्दल तिचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच तिच्याकडून क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षादेखील वाढल्या आहेत.