

वाळवा : हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांचे सर्व अधिकार संचालक मंडळाच्या ठरावाद्वारे काढून घेण्यात आले असून ते उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांना देण्यात आले आहेत. वैभव नायकवडी यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून कारखान्यासमोर सभासद व शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा गौरव नायकवडी यांनी दिला.
यावेळी बोलताना गौरव नायकवडी म्हणाले की, अध्यक्षांनी सभासदांचा विचार न करता कारखान्यावर प्रचंड कर्जाचा बोजा टाकला आहे. भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना जाणीवपूर्वक रोजगारापासून दूर ठेवण्यात आले. संचालकही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले असून उद्यापासून 15 गावांत अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे.
किरण नायकवडी यांनी हुतात्मा बँकेतील व्यवहार पारदर्शक नसल्याचा आरोप केला. केदार नायकवडी यांनी साखर चोरीसंदर्भात गंभीर आरोप करत संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
राजू मुळीक म्हणाले, वैभव नायकवडी यांनी घरात बसून मुलाखत देऊ नये, लोकांसमोर यावे. सूतगिरणी उभा करताना लाखो रुपये गोळा केले त्याचे काय झाले? लोकांच्यात साखर चोर म्हणून नवी ओळख झाली, याचे वाईट वाटते, त्यांनी राजीनामा देऊन बाजूला व्हावे, एच. पाटील (येडे निपाणी) म्हणाले, आमचे गाव कारखाना कार्यक्षेत्रात नाही तरीसुद्धा नागनाथअण्णा यांचा कारखाना म्हणून मोठ्या प्रमाणात ऊस देतो, मात्र वैभव नायकवडी यांनी रस्त्यावर मुरूम टाकायलाही सहकार्य केले नाही, अधिक डवंग म्हणाले, वैभव नायकवडी मेहुणा, बायको आणि सासरा याच्या कल्याणासाठी हुतात्माचा वापर झाला, त्यांनी केलेल्या गैरकारभाराचे एव्हढे पुरावे आहेत, त्यांना यापुढे जेलमध्येच जावे लागेल. केदार नायकवडी म्हणाले, एकदा साखर आंबपमध्ये सापडली, त्यावर धाड पडली, दुसऱ्यावेळी बंद सूतगिरणीमध्ये साखर सापडली, त्यात त्यांच्या मेहुण्यांचाही सहभाग होता, आता तिस़ऱ्यावेळी कारखान्यात सापडली अशा पद्धतीने कोट्यवधी रुपयांची साखर चोरी केली आहे,
आंदोलनस्थळी सभासद शेतकऱ्यांनी गर्दी केली होती, अनेकांना अध्यक्ष यांच्याकडून आपल्याला मिळालेल्या वागणुकीची भाषणात सविस्तर माहिती दिली, यावेळी सनी अहिर, अंकुश चव्हाण, सी. एच. पाटील, राजू मुळीक, अधिक डवंग, बाळासाहेब खराडे यांनी मनोगत व्यक्त केले. वसंत वाजे, बाळासाहेब पाटील, सावकार कदम, अरुण यादव, पोपट अहिर, मानाजी सापकर आदी मान्यवर उपस्थित होते.