

वाळवा : हुतात्मा साखर कारखान्यावर साडेपाचशे कोटींचे कर्ज असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असून केवळ 285 कोटी रुपयांचे कर्ज आहे. सुमारे 100 कोटी रुपयांची साखर शिल्लक असताना जाणीवपूर्वक सभासद आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी सांगितले.
नायकवडी म्हणाले, ॲग्रीनित्यम कंपनीच्या व्यवहारांवर आक्षेप घेणाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. कारखान्याच्या संचालक मंडळाला बदनाम करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. ते म्हणाले, ॲग्रीनित्यम कंपनीने गेल्या आठ वर्षांत सुमारे 500 कोटी रुपयांची उलाढाल केली असून प्रति क्विंटल 4 ते 5 रुपये नफ्यावर साखर खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. यातून सरासरी 30 ते 35 लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. कंपनीची रीतसर नोंदणी असून कोणतीही मालमत्ता नसताना हजारो कोटींचे व्यवहार झाल्याचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत.
हुतात्मा बझारकडून 92 कोटी रुपये कंपनीला दिल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, ती संस्था लहान असून एवढी मोठी रक्कम देणे तांत्रिकदृष्ट्या शक्यच नाही. कारखाना आणि संबंधित संस्थांसाठी मी 35 वर्षे काम केले आहे. केवळ द्वेषापोटी हे बेछूट आरोप होत आहेत. आरोप करणारे माझेच नातेवाईक असल्याने मी आतापर्यंत संयम बाळगला. कारखान्याचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून एनसीडीसीमार्फत 148 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा चुकीचा अर्थ लावला जात आहे.
कामगारांना 40 टक्क्यांहून अधिक बोनस दिला आहे. सध्या एफआरपी आणि एसएमपी यांचा मेळ बसत नसल्याने सर्वच साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. असे असतानाही कामगारांचे वेतन आणि शेतकऱ्यांचे ऊस बिल वेळेत दिले असून कर्जाचे हप्तेही नियमित भरले जात आहेत. चर्चेतूनच या प्रश्नावर योग्य मार्ग निघेल.