

सांगली : दलित महासंघाचा जिल्हा अध्यक्ष उत्तम जिनाप्पा मोहिते (वय 40) याच्या खूनप्रकरणी पसार झालेले मुख्य सूत्रधार गणेश सुरेश मोरे (वय 29, रा. गारपीर चौक, सांगली), सतीश विलास लोखंडे (27, रा. बाल हनुमान वडर कॉलनी, सांगली), अजय परशुराम घाडगे (29, रा. दुधगाव, समडोळी, सांगली) आणि योगेश ऊर्फ अभिजित राजाराम शिंदे (34, रा. इंदिरानगर) या चौघांना पोलिसांनी अटक केली. खूनप्रकरणी पसार असलेले बन्या ऊर्फ यश लोंढे, जितेंद्र लोंढे व समीर ढोले या तिघांचा शोध सुरू आहे.
मंगळवारी मोहिते याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यावेळी संशयित गणेश मोरे याचा आणि उत्तमचा वाद झाला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मोरे, शाहरूख शेख आणि इतर साथीदार धारदार शस्त्र घेऊन उत्तमच्या घराजवळ आले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाची गर्दी संपली होती. मोरे व साथीदार शस्त्र घेऊन येत असल्याचे पाहून उत्तम घरात पळाला.
परंतु घराचा दरवाजा बंद करण्यापूर्वीच त्याला ढकलून हल्लेखोर आतमध्ये शिरले. यावेळी त्यांनी उत्तमवर हल्ला करण्यास सुरुवात करताच त्याचा पुतण्या योसेफ मोहिते हा वाचवण्यासाठी धावला. झटापटीमध्ये त्याच्यावरही हल्ला झाला. उत्तमच्या छातीत, पोटावर खोलवर वार झाल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन मृत झाला, तर झटापटीत हल्लेखोरांपैकी एकाच्या मांडीत चाकू घुसल्याने शाहरूख शेख हादेखील गंभीर जखमी होऊन उपचार सुरू असताना मृत झाला. खुनानंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पथकास, तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सागर होळकर, केशव रणदिवे, प्रमोद खाडे, अविनाश घोरपडे, पोलिस अंमलदार संतोष गळवे, गौतम कांबळे आणि संदीप पाटील यांना हल्लेखोर जयसिंगपूर - कोल्हापूर रस्त्यावर एका ठिकाणी थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने घटनास्थळी सापळा रचून चौघांना जेरबंद केले. चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.