

पलूस : रामानंदनगर (ता. पलूस) येथील बापूवाडी झोपडपट्टीतील रहिवाशांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी गुरुवारी लोटांगण आंदोलनाला सुरुवात केली. रामानंदनगर येथून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे. 43 कुटुंबांतील सुमारे 200 नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
बापूवाडी झोपडपट्टीतील नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर बसून व्यथा मांडल्या. तसेच पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. ग्रामपंचायतीसमोर 14 दिवस बसून आक्रोश आवास न्याय आंदोलन केले. पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन केले. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे झोपडपट्टीधारकांनी दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रामानंदनगर ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन सुरू केले आहे. रामानंदनगर, पलूस, तासगाव, बुधगाव, माधवनगरमार्गे सांगली असा या आंदोलनाचा मार्ग आहे. आंदोलनात महिलांचा, लहानग्यांचा आणि वयोवृद्धांचाही सहभाग दिसून आला. मागील अनेक वर्षांपासून आपल्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी लढा देणार्या या झोपडपट्टीवासीयांनी संघर्षाची तीव्रता वाढवली आहे. शासनाने वेळोवेळी केवळ आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप झोपडपट्टीधारकांनी केला. यावेळी दलित महासंघाचे उत्तम मोहिते म्हणाले, या देशात प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. पण आमच्यावर अन्याय झाला आहे, तो दूर होईपर्यंत ही संघर्षयात्रा थांबणार नाही.
लोटांगण आंदोलनात सांडगेवाडी येथे मधुमेहाचा त्रास असलेल्या सुगरा इराणी (वय 50) या महिलेला अचानक धाप लागू लागली. यावेळी आंदोलकांनी आपत्कालीन रुग्णवाहिकेस संपर्क केला. परंतु रुग्णवाहिका बाहेरगावी असल्याने वेळेत आली नाही. आंदोलक अमीर पठाण यांनी तहसीलदार दीप्ती रिठे-जाधव यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांना तुरची येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.आंदोलनात दलित महासंघाचे उत्तम मोहिते, अमीर पठाण, प्रशांत केदार, युनुस कोल्हापुरे, निशांत आवळेकर, इम्रान शेख, वैभव कोले, गणेश वारे यांच्यासह झोपडपट्टीधारक सहभागी झाले आहेत.
कराड-तासगाव महामार्गावरून सांगलीकडे जाताना झोपडपट्टीधारकांनी हातात निळे झेंडे घेऊन संविधानिक मार्गाने लढा सुरू केला आहे. हे आंदोलन केवळ घराच्या हक्कासाठी नाही, तर माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी असल्याची भावना झोपडपट्टीधारकांनी व्यक्त केली.