

सांगली : विश्रामबागमधील स्फूर्ती चौक परिसरात काही दिवसांपूर्वीच रस्ता रुंदीकरणासाठी खोकी हटवली होती. मात्र, आता रस्त्याला खेटून प्राथमिक शाळेजवळ पुन्हा रातोरात्र खोकी बसवण्याचा धडाका सुरू झाला आहे. ना ठराव, ना मंजुरी; कोणीही, कुठेही उभारा खोकी, असा प्रकार दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी बेकायदा खोक्यांचे पेव फुटले आहे. त्याकडे प्रशासनाची डोळेझाक सुरू आहे.
आलदर चौक ते स्फूर्ती चौक रस्ता रुंदीकरणात विस्थापित झालेल्या आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काही लोकप्रतिनिधींकडून खोके संस्कृतीला फूस दिली जात असल्याचा आरोप नागरिक उघडपणे करत आहेत. मतपेटीच्या राजकारणासाठी शहराचे विद्रुपीकरण होत आहे. मात्र त्याबद्दल कोणाला काही खेद, खंत दिसत नाही. उलट महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने या जागेला भेट दिल्यानंतर, गाळेधारकांना पर्यायी जागा म्हणून ही जागा दिल्याचा तोंडी शब्द दिला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, यासंदर्भात महापालिकेकडून कोणतेही लेखी आदेश किंवा परिपत्रक काढण्यात आलेले नाही, अशी चर्चा जोरात आहे. रस्ता रुंदीकरण पुन्हा अतिक्रमण करण्यासाठीच केले काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रस्त्यात, शाळेजवळ खोकी नकोत
नागरिक हक्क संरक्षण कृती समितीचे निमंत्रक विनायक सिंहासने, गजानन मिरजे म्हणाले, आलदर चौक ते स्फूर्ती चौक रस्ता रुंदीकरणासाठी गेली पंधरा वर्षे लढा दिला जात आहे. अखेर रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला. मार्गात येणारी खोकी काढली. त्या खोक्यांचे आरक्षित जागेत पुनवर्सन करावे. पण ही खोकी रस्त्यात आणि शाळेजवळ उभारली जात आहेत, ते चुकीचे आहे. महापालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी.