सांगली ः उमदी-विजयपूर महामार्गावर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास सराफाला मारहाण करून लुटणार्या सातजणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व उमदी पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीकडून अडीच कोटी रुपयांची रोकड, चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. सराफाने तीन लाखांची रोकड, सोन्याची अंगठी व चारचाकी वाहन चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. प्रत्यक्षात पोलिसांना अडीच कोटी रुपयांची रोकड मिळून आली. त्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.
रवी तुकाराम सनदी (वय 43, माळी वस्ती, उमदी), अजय तुकाराम सनदी (35, माळी वस्ती, उमदी, सध्या रा. गोकुळ पार्क विजयपूर, कर्नाटक), चेतन लक्ष्मण पवार (20, रा. इंडी रोड, विजयपूर), लालसाब हजरत होनवाड (24, रा. उमदी), आदिलशाह राजअहमद अत्तार (27, रा. उमदी), सुमीत सिद्धराम माने (25, रा. पोखणी, ता. उत्तर सोलापूर), साई सिद्धू जाधव (19, रा. उमदी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता सहा दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, उमदी येथील सराफ व्यवसायिक अनिल अशोक कोडग हे मंगळवार, दि. 15 रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास चारचाकी वाहनाने विजयपूर येथे कामानिमित्त निघाले होते. मोरबगी गावाच्या अलीकडे पुलावर चौघांनी त्यांची गाडी अडविली. संशयितांनी त्यांना गाडीतून खाली उतरून काठी व गजाने मारहाण करून जखमी केले. त्यांच्याकडील तीन लाखाची रोकड, सोन्याची अंगठी, मोबाईल व चारचाकी वाहन घेऊन दरोडेखोर पसार झाले. यावेळी संशयितांनी वाहनचालकाला दगडाने मारून जखमी केले होते. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सराफाला लुटल्याची घटना कळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण व उमदी पोलिसांच्या पथकाने दरोडेखोरांचा शोध सुरू केला. त्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांना दरोडेखोरांचा शोध घेण्याचे आदेश दिले. सावंत यांच्या पथकातील हवालदार नागेश खरात, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, संदीप नलावडे यांना तांत्रिक माहितीच्या आधारे व खबर्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दरोड्यातील तीन संशयित कोत्यांव बोबलाद ते विजयपूर रस्त्यावरील झेंडे वस्ती येथे थांबल्याची माहिती मिळाली.
एलसीबीच्या पथकाने झेंडे वस्ती येथे सापळा रचून रवी सनदी, अजय सनदी व चेतन पवार या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, उमदी पोलिस ठाण्याकडील हवालदार संतोष माने यांना याच गुन्ह्यातील चार संशयित चडचण रोडवरील माळावर थांबल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे व त्यांच्या पथकाने सापळा रचून लालसाब होनवाड, आदिलशाह अत्तार, सुमीत माने व साई जाधव या चौघांना ताब्यात घेतले. सातही संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली. यावेळी संशयितांनी चोरीचा मुद्देमाल अजय सनदी याच्या विजयपूर येथील घरात ठेवल्याचे सांगितले. एलसीबीच्या पथकाने विजयपूर येथे घरावर छापा टाकून बेडच्या आत लपविलेली रोकड जप्त केली.
संशयितांनी सराफाला लुटल्यानंतर चारचाकी वाहन व रोकड विजयपूर येथील अजय सनदी याच्या घरात लपविली होती. पथकाने घरावर छापा टाकला असता पोलिसांच्या हाती 2 कोटी 49 लाख 88 हजार रुपयांची रोकड लागली. इतकी मोठी रक्कम पाहून पोलिसही चक्रावले. सनदी याच्या घराबाहेरून चोरीची चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले.
फिर्यादी सराफ कोडग याने साडेतीन लाखाची रोकड चोरीस गेल्याचे तक्रार पोलिसांत केली होती. पण प्रत्यक्षात पोलिसांना संशयितांकडून अडीच कोटी रुपयांची रोकड मिळाली. पोलिसांनी आयकर विभागाला बेहिशेबी रकमेबाबत माहिती दिली असून पथक उमदी पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. या रकमेबाबत पोलिसांकडून फिर्यादीची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. तसेच संशयितांचीही कसून चौकशी केली जाईल. त्यानंतर या रकमेचा उलगडा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सराफ कोडग व त्यांचा वाहनचालक सिद्धू जाधव हे दोघे पहाटे विजयपूरला निघाले होते. सिध्दू जाधव यांचा मुलगा साई हाही काही दिवसापूर्वी कोडग यांच्याकडे कामाला होतो. त्यामुळे कोडग हे कारमधून पैसे घेऊन जातात, याची त्याला माहिती होती. दि. 15 रोजी कारमधून ते पैसे घेऊन जाणार असल्याची माहिती साई याला मिळाली होती. त्याने अजय सनदी व इतर संशयितांशी संपर्क करून पैसे चोरी करण्याची योजना आखल्याचे तपासात समोर आले आहे. पहाटे उमदीतून कोडग निघाल्यापासून साई हा संशयितांना त्यांचे लोकेशन पाठवत होता. पोलिसांनी साई जाधव याच्याही मुसक्या आवळल्या, तसेच वाहनचालक सिध्दू जाधव यांच्या सहभागाबाबतही चौकशी सुरू केली आहे.
उमदी दरोडाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात संशयितांपैकी सुमीत माने हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे शहर पोलिसांत जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याचे घुगे यांनी सांगितले. इतर संशयितांच्या गुन्हेगाराची कृत्याची माहिती घेतले जात आहे.