

जत : उमदी (ता. जत) येथे राष्ट्रीय महामार्गावर डोळ्यात स्प्रे मारून 12 लाख 76 हजारांची लूट झाल्याचा केलेला बनाव अखेर तपासाअंती उघड झाला आहे. उमदी पोलिसांनी अवघ्या 16 तासात या गुन्ह्याचा छडा लावला. व्यापार्याचे पैसे बुडवण्यासाठी बनाव रचणार्या जांभूळ एजन्सीधारकासह या कटात सहभागी असलेल्या तिघांना अटक केली. या कारवाईत 12 लाख 76 हजार 800 रोख रक्कम आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार जप्त केली. यातील एक फरार आहे.
अटक केलेल्यांमध्ये प्रमोद सुभाष शिंदे (वय 32, रा. चौगुले वस्ती, खडकी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), सिद्धेश्वर अशोक डांगे (वय 27, रा. खडतरे गल्ली, ता. सांगोला) आणि तौफिक समशेर मणेरी (वय 35, रा. मणेरी मळा, जुना सावे रोड, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील अक्षय इंगोले (रा. सांगोला, जि. सोलापूर) हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा येथील प्रमोद सुभाष शिंदे हा बुधवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास चालक अभिजित नारायण वाडकर यांच्यासोबत आंध्र प्रदेशला जांभूळ व्यापारातील पैसे देण्यासाठी जात होता. उमदी हद्दीत पोहोचल्यावर शिंदे याने उलटी आल्याचे निमित्त करून वाडकर यांना थांबण्यास भाग पाडले. याचवेळी मागील मोटारीतून आलेल्या तिघांनी डोळ्यात स्प्रे मारून 12 लाख 76 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची फिर्याद चालक वाडकर यांनी उमदी पोलिसांत दिली होती.
पोलिसांनी फिर्यादी वाडकर आणि एजन्सीधारक शिंदे या दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी जांभूळ फळ एजन्सीधारक प्रमोद शिंदे यानेच हा लुटीचा बनाव रचल्याचे समोर आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. शिंदे याच्याकडे कौशल्याने तपास केला असता, ही रक्कम त्याचे मालक फारुख यांनी आंध्र प्रदेशमध्ये पोहोचवण्यासाठी दिली होती, असे समोर आले. एवढी मोठी रक्कम पाहून शिंदेला हव्यास सुटला आणि त्याने मित्र सिद्धेश्वर डांगे ऊर्फ दादा दांडगे, तौफिक मणेरी आणि अक्षय यांना सोबत घेऊन लुटीचा बनाव केला.
या नियोजित कटानुसार, त्यांनी उमदीजवळ 12 लाख 76 हजार 800 रुपये चोरून नेल्याचा बनाव केला. मुद्दाम चालकामार्फत पोलिसांत खोटी फिर्याद दिली. जेणेकरून जबरी चोरी झाल्याचे भासवता येईल. ही रक्कम चौघांनी आपापसात वाटून घेण्याचे ठरवले होते.