

सांगली : अवैधरित्या गौण खनिज मातीची वाहतूक केल्याप्रकरणी दोन ट्रॅक्टर आणि जेसीबी जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांच्या पथकाने कसबेडिग्रज (ता. मिरज) येथे केली. याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून, 9 लाख 59 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कसबेडिग्रज येथे अवैधरित्या मातीची वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर (क्र. एमएच 10 एवाय 6471) व (क्र. एमएच 09 ईव्ही 1662) व जेसीबी (क्र. एमएच 10 सीक्यू 9004) आढळून आले. या वाहनांमध्ये परवाना नसलेली सहा ब्रास माती सापडली. ही तिन्ही वाहने जप्त करण्यात आली. याप्रकरणी वाहतूक करणारे सुशांत सुरेश कदम यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. माती वाहतूक प्रकरणी 9 लाख 59 हजार 690 रुपयांच्या दंडाची नोटीस पाठवण्यात आली आहे.
यापुढेही अवैध गौण खनीज वाहतूक आणि उत्खननप्रकरणी कारवाई सुरुच राहणार असल्याची माहती अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे आणि नायब तहसीलदार मनोहर पाटील यांनी दिली.