

वारणावती : वारणावती (ता. शिराळा) येथील नागरी वसाहतीत रविवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक नव्हे, तर दोन बिबट्यांचे दर्शन झाले. येथील करमणूक केंद्राजवळ वाय. टी. पाटील यांच्या घरासमोरून दोन बिबटे जाताना अनेकांनी पाहिले. पाटील यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही बिबटे कैद झाले. बिबट्यांच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
वारणावती वसाहत सध्या निर्मनुष्य होऊ लागली आहे. काही मोजकेच कर्मचारी येथे राहतात. वसाहतीची पूर्ण दुरवस्था झाली आहे. झाडाझुडपांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे वसाहत वन्यप्राण्यांचे आश्रयस्थान बनू लागली आहे. अशातच जीव मुठीत घेऊन येथील नागरिक राहतात. संबंधित प्रशासन किंवा वन्यजीव विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे येथे वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वसाहतीत गवे, बिबटे, अजगर यांचे वास्तव्य आहे. त्यांचे वारंवार येथे दर्शन होते. यापूर्वीही वसाहतीत बिबट्याचे दर्शन अनेकवेळा झाले आहे. येथील अमीन गुड्डापुरे यांच्या घरासमोरील कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला भक्ष्य बनवले होते. काही दिवसापूर्वी राजू कांबळे यांच्या घरासमोरून बिबट्या जाताना अनेकांनी पाहिला. वसाहतीत रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य असते. संबंधित प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे येथील नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत.