

जत : शहरापासूनच पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जत-वळसंग राज्यमार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ दोघांच्या तोंडाला गुंगीचे औषध लावून त्यांच्याजवळील 35 हजारांची रोकड लंपास करण्यात आली. ही घटना मंगळवार, दि. 9 रोजी दुपारी घडली. सुखदेव बंडू करे (वय 40) व शंभू खराडे (55) अशी लूट झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, सुखदेव करे हे मंगळवारी दुपारी गावातील खराडे यांना घेऊन वळसंगमार्गे जतला निघाले होते. एका पेट्रोल पंपाजवळ सुखदेव करे यांची दुचाकी चौघांनी थांबवली. त्यांनी करे व खराडे यांना बोलण्यात गुंतवले. त्याचवेळी त्यांच्या तोंडाला गुंगी येणारे औषध लावले. गुंगीचे औषध लावताच दोघेही बेशुद्ध झाले.
त्यानंतर करे यांच्याजवळील 35 हजाराची रोकड त्यांनी काढून घेतली. दोघांनाही जवळच्या शेतात टाकून चौघांनीही पलायन केले. सायंकाळी घटनेची माहिती 108 वाहनावर चालक असलेले योगेश मोटे यांना मिळाली. त्यांनी दोघांना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यंत करे हे शुद्धीत आले नव्हते. खराडे यांनी, चौघांनी गुंगीचे औषध तोंडाला लावून बेशुद्ध केले व रोकड लंपास केल्याचे सांगितले.