

कुपवाड : सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने भांडत आरडाओरडा करीत हाणामारी करणार्या दोन सराईत गुन्हेगारांना कुपवाड पोलिसांनी अटक केली. सोन्या ऊर्फ सूरज मुनीर मुळवाड (वय 25) व सुनील तात्यासाहेब दुधाळ (25, दोघेही रा. दत्तनगर, बामणोली, ता. मिरज) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
कुपवाड एमआयडीसीत दोन तरुण सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने भांडत आरडाओरडा करीत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना मिळाली. त्यांनी पोलिसांना तातडीने घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी भांडणे सोडवून त्यांना शांत राहण्यास सांगितले असता दोघांनी पोलिसांचे ऐकून न घेता पुन्हा मारामारी व भांडण सुरू केले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे सिध्द झाले. सोन्या ऊर्फ सूरज मुळवाड व सुनील दुधाळ या दोघांनी सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दोघांविरोधात कुपवाड व विश्रामबाग पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.