

सांगली : शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदा घातक शस्त्रसाठा बाळगणाऱ्या दोन सराईत तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने रंगेहात पकडले. चाणक्य चौक ते रेल्वे ब्रीज रस्त्यावर आकाश सायकल मार्टसमोर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी संशयितांकडून दोन तलवारी, दोन कोयते, दोन कट्यार, एक चाकू आणि कुकरी असा शस्त्रसाठा जप्त केला असून, याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश ऊर्फ टक्या बसवराज वठार (वय २३, रा. अष्टविनायक नगर, गल्ली क्र. ७, विजयनगर, सांगली) आणि दऱ्याप्पा पंडित दोडमणी (२३, रा. अष्टविनायक नगर, गल्ली क्र. ८, विजयनगर, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
एलसीबीचे सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार व पथकातील कर्मचारी विजयनगर परिसरात गस्त घालत असताना कॉन्स्टेबल विक्रम खोत, हवालदार दरीबा बंडगर आणि सतीश माने यांना गोपनीय बातमीदाराद्वारे याबाबत माहिती मिळाली. राकेश वठार आणि दऱ्याप्पा दोडमणी हे दोघे विजयनगर ते कुपवाड रस्त्यालगत बेकायदा शस्त्रे घेऊन थांबल्याची माहिती मिळताच पथकाने तातडीने चाणक्य चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संजीवनी मारुती मंदिराच्या अलीकडे सापळा रचला.
यादरम्यान आकाश सायकल मार्टसमोर दोघे संशयास्पदरीत्या पांढऱ्या रंगाचे कापड व पिशवीत काहीतरी गुंडाळून उभे असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना जागीच घेरून ताब्यात घेतले व पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली. यावेळी राकेश वठार याच्या हातातील पांढऱ्या कापडात तलवारी आणि दऱ्याप्पा दोडमणी याच्याजवळील प्लास्टिक पिशवीत कोयते, कट्यार, कुकरी व शिकारी चाकू मिळून आले. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी ही हत्यारे सोबत बाळगल्याची कबुली संशयितांनी दिली.
पोलिसांनी सर्व शस्त्रे पंचनाम्याद्वारे जप्त केली. याप्रकरणी पोलिस शिपाई विक्रम खोत यांच्या फिर्यादीवरून संजयनगर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी दोन्ही संशयितांना संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.