

सांगली : शहरातील वाल्मिकी आवास येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ बापू कांबळे (वय 20) याचा भरदिवसा निर्घृण खून करणार्या दोघांना शहर पोलिसांकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने बारा तासात अटक केली. मुख्य संशयितासह दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करण महादेव गायकवाड (वय 20, रा. राजीव गांधी नगर, सांगली) आणि युवराज हणमंत कांबळे (19, रा. टिंबर एरिया, नवीन वसाहत, सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
सौरभ हा वाल्मिकी आवास परिसरात राहत होता. त्याच्यावर मारामारीसह दोन गुन्हे दाखल होते. संशयित करण आणि सौरभ यांच्यात आठ दिवसापूर्वी वादावादी झाली होती. त्याच वादाचा राग संशयितांच्या मनात खदखदत होता. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर त्यांनी बिल्डिंग क्रमांक सात येथे सौरभला नेले. त्याठिकाणी एडका आणि दगडाने त्याच्या डोक्यात, मानेवर आणि हातावर सपासप वार करण्यात आले. घाव वर्मी लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्लेखोर तेथून पसार झाले. खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपअधीक्षक विमला एम., सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. पसार झालेल्या संशयितांच्या शोधासाठी पथके तत्काळ रवाना करण्यात आली.
सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक संशयितांचा शोध घेत होते. यावेळी पथकातील कर्मचार्यांना माहिती मिळाली की, सौरभ कांबळे खुनातील गायकवाड टोळी टिंबर एरिया येथील बंद गोडाऊनच्या आत लपून बसली आहे. पथकाने मध्यरात्री त्याठिकाणी छापा टाकत मुख्य संशयित करण गायकवाड, युवराज कांबळे या दोघांसह दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. गायकवाड व कांबळे या दोघांची कसून चौकशी केली. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून खून केल्याचे कबूल केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय मोरे, सहायक निरीक्षक सागर गौड, उपनिरीक्षक महादेव पोवार, कर्मचारी संदीप पाटील, विनायक शिंदे, सतीश लिंबळे, योगेश पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, प्रशांत पुजारी, विशाल कोळी, योगेश हाक्के, संदीप कोळी, गणेश कोळेकर, दिग्विजय साळुंखे आणि रमेश लपाटे यांनी केली.
पाच ते सहा वर्षांपूर्वीच्या एका गुन्ह्यात करण पोलिसांच्या रेकॉर्डवर आला होता. तेव्हा तो अल्पवयीन होता. अल्पवयीन असताना त्याच्यावर मोक्का कायद्याखाली कारवाई केली होती. त्याला पुण्यातील बालसुधारगृहात ठेवले होते. तेथून तो पळून सांगलीला आला होता. पुन्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन वर्षाने तो सांगलीत वाल्मिकी आवासमध्ये राहण्यास आला होता. सध्या टिंबर एरियातील नवीन वसाहतीत तो राहतो.