हळदीचे दर क्विंटलमागे पाच हजारांनी गडगडले

जागतिक मागणी घटल्याचा परिणाम : व्यापार्‍यांत चिंता
termaric rate In Market Goes down
हळद Pudhari Photo
Published on
Updated on

सांगली : शशिकांत शिंदे

जागतिक बाजारात हळदीची मागणी घटली आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे हळदीच्या सरासरी दरात क्विंटलमागे पाच हजार रुपये घसरण झाली आहे. दरात घसरण झाल्याने हळद व्यापार्‍यांत एकच घबराट निर्माण झाली आहे.

Summary

प्रमुख बाजारपेठेतील प्रतिक्विंटलचे सरासरी दर

  • नांदेड 13,090

  • हिंगोली 13,000

  • वसमत 14,605

  • सांगली 13,200

सांगलीची हळद बाजारपेठ ही आशिया खंडातील नामांकित बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथील हळद गुणवत्तेची असल्याने मोठी मागणी असते व दरही चांगला मिळतो. गेल्या वर्षी अनेक भागात कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची परिस्थिती होती. त्यामुळे उत्पादन कमी होऊन आवक घटली होती. परिणामी दरात मोठी वाढ झाली. मार्च-एप्रिलमध्ये हळदीचा दर क्विंटलला 15 ते 21 हजार रुपये होता. काही शेतकर्‍यांच्या गुणवत्तेच्या हळदीचा दर 70 हजार रुपये क्विंटल असा उच्चांकी मिळाला. दर वाढत असल्याने अनेक व्यापार्‍यांनी हळद खरेदी करून वेअर हाऊसला ठेवली. दर वाढल्याचा शेतकर्‍यांना फायदा झाला. मात्र सध्या हळदीला प्रतिक्विंटल 11 ते 15 हजार रुपये दर मिळत आहे. दरात सरासरी 5 हजार रुपये घसरण झाली आहे. त्यामुळे व्यापारी धास्तावले आहेत. हळदीची निर्यात घटल्याने दर घसरल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

termaric rate In Market Goes down
सांगलीची हळद, बेदाण्यासह कोल्हापुरी चप्पलला पसंती

हळदीच्या भावात पुन्हा सुधारणा अपेक्षित असून, दर तेजीत राहू शकतो, असा अंदाज आहे. सध्या दर कमी झाले तरी सध्याचा भाव गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आहे. गेल्यावर्षी याच काळात हळद 6 हजार ते 7 हजार रुपयांच्या दरम्यान हळद विकली जात होती. सध्याच्या दरात जास्त घसरण होण्याची शक्यता कमीच असल्याचे व्यापार्‍यांचे मत आहे.

उत्पादन कमी झाल्याने देशात हळदीचे भाव वाढल्यानंतर निर्यात मंदावली आहे. जानेवारी ते मार्च या काळात निर्यात मोठ्या प्रमाणात घटली. बाजारात हळदीची आवक वाढत आहे. आता आलेली नरमाई प्रामुख्याने बाजारातील वाढलेली आवक आणि मंदावलेली निर्यात यामुळे आल्याचे काही व्यापारी सांगतात. तसेच नेमके पीक किती हेही अद्याप स्पष्ट नाही. येथील बाजारपेठेत राज्यासह आंध्र, कर्नाटक तामिळनाडू राज्यातून हळद येते. देशभरात 35 ते 40 लाख पोती हळद शिल्लक असण्याचा अंदाज आहे. त्यात सांगली बाजारपेठेत साडेचार ते पाच लाख पोती हळद शिल्लक आहे. गेल्या वर्षी या काळात अडीच लाख पोती हळद शिल्लक होती.

image-fallback
सांधेदुखीवरही हळद ठरते गुणकारी | पुढारी

बियाणे दरात दुपटीने वाढ

हळदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने व यंदा पाऊस चांगला झाल्याने अनेक शेतकरी हळद लागवडीकडे वळले. त्यामुळे हळदीच्या बियाणात दुपटीने वाढ झाली. गेल्यावर्षी हळदी बियाणे क्विंटलला साडेतीन हजार रुपये होते. यंदा मात्र हा दर आठ हजार रुपयापर्यंत गेला. तरी सुद्धा अनेक शेतकर्‍यांनी हळदीची लागवड केली आहे.

termaric rate In Market Goes down
हळद लागवड कशी करावी?
सांगलीची हळद ही गुणवत्तेची हळद म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी हळदीला चांगला दर मिळतो. त्यामुळे राज्यासह आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू राज्यातून आवक होते. इतर बाजारपेठांच्या तुलनेत चांगला दर आहे.
- काडाप्पा वारद, हळद व्यापारी व संचालक, सांगली बाजार समिती
मागणी कमी झाल्याने बाजारात मंदी आली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. गणेश चतुर्थी संपल्यानंतर दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी पाऊस चांगला आहे. पुढेही पाऊस कायम राहिल्यास उतारा कमी होऊन दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
- मनोहर सारडा, माजी अध्यक्ष, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स व हळद व्यापारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news