सांगली : देशातील एकतृतियांश लोकसंख्या असलेली मुंबई आणि परिसरातील भाग परप्रांतीयांच्या ताब्यात गेले आहेत. या जोरावर मुंबईला केेंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी होईल आणि केेंद्रातून ती मान्यही होईल. असे झाले तर महाराष्ट्राचे मुंबई, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे तीन तुकडे पडतील. त्रिभाषा सक्ती ही महाराष्ट्राच्या विभाजनाची सुरुवात आहे, असा घणाघाती आरोप शालेय शिक्षण अभ्यास व कृती सन्मान समितीचे निमंत्रक डॉ. दीपक पवार यांनी केला. महाराष्ट्राच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रकाश परब यांनीही याबाबत रोखठोक भूमिका मांडली.
‘मराठी भाषा आणि मराठी माणूस : अस्तित्वाचे प्रश्न’ या विषयावर डॉ. दीपक पवार व डॉ. प्रकाश परब यांचे मराठा सेवा संघाच्या हॉलमध्ये विशेष व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. डॉ. पवार म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात, राज्याच्या आराखड्यात हिंदी भाषेची सक्ती नाही. त्रिभाषा सूत्रातही पहिलीपासून हिंदीची सक्तीची भूमिका नाही. तरीही सरकारला हिंदीची सक्ती करायची आहे, याच धोरणानुसार मग उत्तर प्रदेशात मराठीची सक्ती करण्याची हिंमत सरकारकडे आहे का? तशी हिंमत दाखवायला पाठीचा कणा मजबूत असावा लागतो, जो राक्षसी बहुमत असणार्यांकडे नाही.
इंग्रजीतले शिक्षण आणि इंग्रजी शाळाच चांगल्या, असे समजून मुलांना तिकडेच घालणार्या मध्यमवर्गीय पालकांच्या गैरसमजुतीने विचित्र परिस्थिती तयार झाल्याचेही त्यांनी सांगितले. एकाही नेत्याने मराठी शाळा काढली नाही. मराठी माणसाचा कणा भुसभुशीत झालाय हे समजल्यामुळे फडणवीस यांना आत्मविश्वास आल्याची टीकाही त्यांनी केली. डॉ. परब यांनी, मराठी माणूस मराठी भाषेबाबत सजग नसल्याची खंत व्यक्त केली. शिक्षणात हिंदी भाषा घेताना भाषा सल्लागार समितीला विचारात घेतले नाही. हे सारे महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचे डाव आहेत. हे सारे राजकारण आहे. भीमराव धुळूबुळू यांनी स्वागत , तर अभिजित पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दयासागर बन्ने यांनी आभार मानले.
मुळात शक्तिपीठ हे नावच फसवे आहे. या नावावरून हा महामार्ग देवांना जोडणारा असेल असे वाटत असले तरी प्रत्यक्षात तो अदानींच्या खाणी जोडणारा मार्ग आहे. मराठी भाषा आणि शेती-शाळा टिकली तर मराठी माणूस टिकेल, असे मत डॉ. पवार यांनी व्यक्त केले.