

मिरज : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन यशस्वी झाली. शनिवारी सकाळी कोल्हापूरहून ही एक्स्प्रेस सोडण्यात आली. ही गाडी 11 वाजता मिरज जंक्शनमध्ये दाखल झाली. त्यानंतर घेतलेली ट्रायल रन यशस्वी पार पडली. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस हुबळी-मिरज-पुणे आणि उर्वरित तीन दिवस कोल्हापूर-मिरज-पुणे अशी धावणार आहे.
हुबळी विभागाच्या विभागीय रेल प्रबंधकांच्या नेतृत्वाखाली हुबळी ते मिरज ट्रायल रन यशस्वी झाली होती. शनिवारी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे, अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर ते पुणेपर्यंत ट्रायल पार पडली. ती देखील यशस्वी झाली होती. या ट्रायल रनदरम्यान मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय व्यवस्थापिका इंदू दुबे यांनी कोल्हापूर, मिरज, सांगली आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर विविध प्रवासी संघटना पदाधिकार्यांच्या भेटी घेतल्या. या एक्स्प्रेसने जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करावा ,असे आवाहन देखील त्यांनी केले.
ट्रायल रननंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून ही एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. ही एक्स्प्रेस सुपरफास्ट असली तरीही, या गाडीला सांगली आणि किर्लोस्करवाडी या छोट्या स्थानकांवर देखील थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातून मिरज जंक्शनसह छोट्या स्थानकांवरून प्रवास करणार्या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
बुकिंग सुरू : हुबळी ते पुणे
वंदेभारत एक्स्प्रेसचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे. 20669 हा हुबळी ते पुणे यादरम्यानच्या वंदे भारत एक्स्प्रेसचा क्रमांक रेल्वेकडून देण्यात आलेला आहे. या एक्स्प्रेसने प्रवास करू इच्छिणार्या प्रवाशांना ऑनलाईन आणि काऊंटर तिकिटाची देखील सोय करून देण्यात आलेली आहे.
दोन विभाग : या एक्स्प्रेसमध्ये दोन विभाग करण्यात आलेले आहेत. चेअर कार क्लास आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार क्लास अशा दोन विभागामध्ये ही एक्स्प्रेस विभागली आहे. चेअर कार क्लासच्या तुलनेत एक्झिक्युटिव्ह चेअर कार क्लासच्या तिकिटाचे दर जवळपास दुप्पट आहेत.
चेअर कार क्लास : हुबळी ते पुणे 1185 रुपये (1530 रुपये), धारवाड ते पुणे 1160 रुपये (1505 रुपये), बेळगाव ते पुणे 955 रुपये (1295 रुपये), मिरज ते पुणे 740 रुपये (975 रुपये), सांगली ते पुणे 730 रुपये, (965 रुपये). एक्झिक्युटिव्ह चेअर कार क्लास : हुबळी ते पुणे 2385 रुपये (2725 रुपये), धारवाड ते पुणे 2325 रुपये, (2725 रुपये), बेळगाव ते पुणे 1890 रुपये (2290 रुपये), मिरज ते पुणे 1445 रुपये (1705 रुपये), सांगली ते पुणे 1430 रुपये (1690 रुपये).