

सांगली : येथील उद्योग भवनच्या आवारात 31 वृक्ष व वडाच्या झाडाच्या फांद्या तोडलेल्या आहेत. वृक्ष संगोपन आणि संवर्धनाचे नियम धाब्यावर बसवत वृक्ष तोडले आहेत. उद्योग भवनचे महाव्यवस्थापक व वृक्ष तोडणाऱ्यांकडून 1.65 लाख रुपये दंड वसूल करावा. दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संभाजी सावंत यांनी केली आहे.
सावंत म्हणाले, वृक्ष संगोपन आणि संवर्धन नियम धाब्यावर बसवत वृक्ष तोडल्याबद्दल प्रतीवृक्ष 5 हजार रुपये, याप्रमाणे 1.55 लाख रुपये वसूल करावेत. वडाच्या बहुसंख्य फांद्या तोडल्याबद्दल वृक्ष संगोपन आणि संवर्धन नियमाचे उल्लंघन केले म्हणून 10 हजार रुपये दंड वसूल करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी, आयुक्तांना अर्ज दिला आहे. अर्ज प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांमध्ये योग्य तो निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही व कारवाई करावी.
दरम्यान, महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख तथा पर्यावरण अभियंता अजित गुजराथी म्हणाले, उद्योग भवन आवारातील झाडांचा विस्तार कमी करणे, उंची कमी करण्यासाठी तसेच धोकादायक फांद्या तोडण्यासाठी उद्योग भवनच्या व्यवस्थापकांनी महापालिकेकडे परवानगी मागितली होती. जुलै 2025 मध्ये त्यांचा अर्ज आला होता. त्यावर 50 झाडांचा विस्तार कमी करणे, उंची 20 फुटापर्यंत कमी करण्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये परवानगी दिली आहे.