

सांगली : तुंग (ता. मिरज) येथे ऊसतोड कामगार पुरविण्याच्या बहाण्याने वाहतूकदाराला 10 लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी रावसाहेब बाळकृष्ण कदम यांनी संदीप लक्ष्मण आडे (रा. कुहा, ता. रिसोड, जि. वाशीम) याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी, रावसाहेब कदम यांना ऊस गळीत हंगामासाठी दहा पुरुष आणि दहा महिला पुरवितो, असे संदीप आडे याने सांगितले होते. त्यासाठी त्याने दहा लाख रुपये उचल घेतली होती. त्यामध्ये पाच लाख पाच हजार रुपये रोखीने, तर चार लाख 95 हजार रुपये ऑनलाईन बँकेद्वारे घेतले होते. पण दहा लाख रुपये देऊन देखील संदीप आडे याने कामगार पुरविले नाहीत. तसेच पैशाची मागणी केली असता, पैसे देण्यासही टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच कदम यांनी आडे याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.