

सांगली : जुन्या बुधगाव रोडवरील इमारतीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोमवारपासून स्थलांतरित होत आहे. त्यामुळे सुमारे सव्वाशे कुटुंबीयांच्या रोजंदारीवर गंडांतर आले आहे. आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून लोकप्रतिनिधी, महापालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. नव्या जागेत त्यांना स्थान देण्यात न आल्याने आरटीओ एजंट, चहा टपरी, नाष्टा सेंटर, स्टेशनरी, झेरॉक्स, हॉटेल, वाहन दुरुस्ती करणार्यांची दुकाने आता बंद पडणार आहेत.
सहा महिन्यांपासून जुन्या बुधगाव रोडवरील जुन्या महसूल कर्मचार्यांच्या इमारतीमध्ये आरटीओ कार्यालयाचे स्थलांतर करण्याचा निर्णय झाला होता. सुविधा नसल्याचे कारण सांगून अधिकारी याठिकाणी जाण्यास इच्छुक नव्हते. चार दिवसांपूर्वी प्रादेशिक आयुक्तांचे प्रशासनाला पत्र आले. सोमवारी नव्या जागेत कार्यालय सुरू करण्याचे सक्तीचे आदेश आल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून जुन्या जागेतील साहित्य नव्या जागेत स्थलांतरित करण्यात येत आहे. याची माहिती मिळताच गुरुवारी आरटीओ कार्यालय परिसरात व्यवसाय करीत असलेले आरटीओ एजंट, चहा टपरी, नाष्टा सेंटर, स्टेशनरी, झेरॉक्स, हॉटेल, वाहन दुरुस्ती करणारे व्यावसायिक आदींंच्या चेहर्यावर चिंतेचे वातावरण पसरले.
नव्या जागेत जागांच्या किंमती आता भरमसाट वाढल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी स्थलांतर होणे अवघड बनले आहे. नव्या जागेत रस्त्याकडेला आम्हाला खोकी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गेल्या दोन महिन्यापासून येथील खोकीधारक लोकप्रतिनिधी, महापालिका व जिल्हाधिकारी यांच्याकडे करीत आहेत. मात्र याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
माधवनगर रोडवर असलेल्या आरटीओच्या कार्यालयात प्रशासकीय कामकाज गेल्या 50 वर्षापासून चालत आले होते. ही इमारत 1976 ची असून ही जागा खासगी मालकीची आहे. याला जवळपास 45 हजार रुपयांचे भाडे आहे. याठिकाणी वाहतूक परवाना देणे, ड्रायव्हिंग टेस्ट, वाहनाचे फिटनेस, शिकाऊ आणि कायमस्वरूपी वाहन चालकांना परवाना देण्याचे काम चालते. याठिकाणी प्रशासकीय कामासाठी रोजची सुमारे दोनशे लोकांची ये जा असते. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग 50 ते 60 च्या घरात आहे. आता कार्यालय स्थालांतर होत असल्यामुळे याठिकाणचा खासगी व्यवसाय ठप्प होणार आहे.
आरटीओ कार्यालय स्थलांतर होणारी जागा 44 गुंठे आहे. यासाठी पूर्ण कंपौंड भिंत बांधण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम सुमारे सात हजार स्क्वेअर फूट आहे. आरटीओ कार्यालयासाठीच ही जागा अपुरी पडत असल्यामुळे याठिकाणी खासगी व्यावसायिकांना जागा मिळणे अशक्य आहे. रोडकडेला खोकी ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी होत आहे.