

मिरज : तिरुनेलवेल्ली ते दादर एक्स्प्रेसमध्ये तब्बल 12 तास पाणी नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी ही एक्स्प्रेस मिरज रेल्वे स्थानकात शनिवारी तब्बल 3 तास 40 मिनिटे रोखून धरली. संतप्त झालेल्या प्रवाशांनी मिरज रेल्वे स्थानकात ठिय्या मारला. तसेच जोपर्यंत रेल्वेत पाणी भरले जाणार नाही, तोपर्यंत रेल्वे पुढे जाणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली.
तिरुनेलवेल्ली ते दादर (क्रमांक 11022) ही एक्स्प्रेस शुक्रवारी दुपारी तीन वाजून 40 मिनिटांनी सुटली. ती हुबळी स्थानकात आल्यानंतर एक्स्प्रेसमधील पाणी संपले होते. त्या ठिकाणी गाडीमध्ये पाणी भरण्याची प्रवाशांनी विनंती केली. परंतु हुबळी विभागाने देखील, पाणी मिरजमध्ये भरले जाईल, असे सांगून गाडी पुढे रवाना केली. त्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत या गाडीत पाणीच नव्हते.
मिरज स्थानकात प्रवाशांनी गाडीत पाणी भरण्याची विनंती केली. परंतु मिरज रेल्वे स्थानकात पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने मिरज रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही. एक्स्प्रेस तशीच मिरजेतून पुढे रवाना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु संतप्त प्रवाशांनी ती रोखून धरली. यावेळी रेल्वेचे अधिकारी आणि प्रवाशांमध्ये जोरदार वादावादीचा देखील प्रकार घडला. ही एक्स्प्रेस तब्बल तीन तास प्रवाशांनी मिरज रेल्वे स्थानकात रोखून धरली होती. यावेळी प्रवाशांनी स्थानकातील फलाट क्रमांक एकवर ठिय्या मारल्याने रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली.
तिरुनेलवेल्ली ते दादर एक्स्प्रेसने प्रवास करून तेथून दुसर्या एक्स्प्रेसने प्रवास करणार्या प्रवाशांनी विना पाण्याची गाडी पुढे रवाना करण्याची विनंती केली. परंतु यावेळी संतप्त प्रवासी आणि गाडी पुढे रवाना करण्याची मागणी करणार्या प्रवाशांमध्ये जोरदार बाचाबाची आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला.