

कोकरूड : आटुगडेवाडी (मेणी, ता. शिराळा) येथे खासगी शाळेचे विद्यार्थी घेऊन निघालेल्या मोटारीवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. श्रीशा श्रीनाथ इंगळे (वय ५ वर्षे, रा. मेणी, ता. शिराळा) असे मृत मुलीचे नाव आहे. तसेच या अपघातात अंशिका संजय पाटील (वय ४ , रा. मेणी) अभिराज सागर कडोले (वय ४, रा. येळापूर), ज्ञानेश्वरी दत्तात्रय आटुगडे (वय ८, रा. आटुगडेवाडी), तनुष ऋषिकेश पाटील (रा. हात्तेगाव, ता. शिराळा) ही चार मुले जखमी झाली आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (दि. १०) रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली. घटनेची फिर्याद महादेव सुरेश इंगळे यांनी कोकरूड पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सह्याद्री पब्लिक स्कूल शिराळा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची दुसरी शाखा येळापूर पैकी वाघमारेवाडी येथे सुरू झाली आहे. या शाळेतील मुले ने-आण करण्यासाठी येथील युवराज वसंत कदम (रा. कुमठे, पवारवाडी, ता. पाटण, सध्या रा. शेडगेवाडी) यांची मोटार (एमएच १०, इइ ७९३१) आहे. सोमवारी ते मेणी परिसरातील मुले घेऊन जात असताना कराड-रत्नागिरी राज्य महामार्गावर आटुगडेवाडी (ता. शिराळा) येथे आले असता, त्यांचा मोटारीवरील ताबा सुटून मोटार रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाच्या कठड्याला जोरदार धडकली. या धडकेत चालकाशेजारी बसलेल्या श्रीशा श्रीनाथ इंगळे हिच्या डोक्यास व छातीस जोराचा मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार मुले जखमी झाली. जखमींवर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आमदार सत्यजित देशमुख, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. कोकरूड पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.