Sangli Accident : कोडोली येथे ट्रॅक्टर उलटून मांगलेचा चालक ठार

कोडोली-वाठार रस्त्यावरील घटना
 Sangli Accident news
कोडोली येथे ट्रॅक्टर उलटून मांगलेचा चालक ठार
Published on: 
Updated on: 

कोडोली : वारणा साखर कारखान्यामध्ये ट्रॉलीतील ऊस उतरवून भरधाव वेगाने मांगले गावाकडे जात असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या डिव्हायडरवर ट्रॅक्टर आदळून बाबासो यशवंत मोहिते (वय ५६, रा. मांगले, ता. शिराळा) हा ट्रॅक्टर चालक रस्त्यावर जोरदार आपटल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता कोडोली-वाठार रस्त्यावर घडली.

गुरुवारी रात्री सहा वाजता मांगले गावातून ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलींमधून ऊस भरून बाबासो मोहिते वारणा साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यामध्ये आले. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ट्रॉलीतील ऊस उतरवून मांगले गावी भरधाव जात असताना कोडोली-वाठार रस्त्यावरील विराज गॅस एजन्सी समोर आले असता ट्रॅक्टर चालक मोहिते यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला व ट्रॅक्टर-ट्रॉलीसह रस्त्याच्या डिव्हायडरवर जोरात आदळून समोरील खड्ड्यामध्ये जाऊन कोसळला.

यावेळी मोहिते हे रस्त्यावर आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना तातडीने वारणा कारखान्याच्या रुग्णवाहिकेतून कोडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मोहिते यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.