

आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी) येथील दत्त मंदिर फाट्याजवळ ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात बचेरी (ता. माळशिरस) येथील सागर माने (वय 25) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. 7 डिसेंबररोजी पहाटे साडेचार वाजता घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सागर माने हे पहाटे ऊसतोडीच्या कामासाठी ट्रॅक्टर घेऊन निघाले होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दिघंची येथील दत्त मंदिर फाट्याजवळ त्यांचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात सागर हे ट्रॅक्टरखाली दबले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरू केले, मात्र चालक सागर माने यांना वाचवणे शक्य झाले नाही.
अपघाताची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघात स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
सलग दुसऱ्या दिवशी अपघात
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या जोमात सुरू आहे. परिणामी दिवस-रात्र ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रेलरची मोठ्या प्रमाणावर ये-जा वाढली आहे. अतिरेकी वेग, चालकांचा थकवा, रात्रीची वाहतूक आणि सिग्नल अथवा परावर्तक फलकांच्या कमतरतेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी ढोले मळा परिसरात झालेल्या अपघातात राजेवाडी येथील एका युवकाचा मृत्यू झाला होता. वारंवार होणारे अपघात पाहता, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.