

मळणगाव : नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील मुस्लिम कुटुंबातील चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सासू आणि सुनेचा मृत्यू झाला असून वडील आणि मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या दोघांवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मन हेलावून टाकणारी ही घटना शुक्रवार, दि. 18 रोजी दुपारी उघडकीस आली. या कुटुंबातील दोन बालके मात्र सुखरूप आहेत.
रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय 45) असे मृत सासूचे, तर काजल समीर पाटील (30) असे सुनेचे नाव आहे. अल्लाउद्दीन मकबूल पाटील (55) आणि समीर अल्लाउद्दीन पाटील (35) या पिता-पुत्राची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नांगोळे-ढालगाव रस्त्यालगत पाटील कुटुंबीयांचे घर आहे. घरामध्ये अल्लाउद्दीन मकबूल पाटील, रमेजा अल्लाउद्दीन पाटील, समीर अल्लाउद्दीन पाटील व काजल समीर पाटील यांच्यासह दोन लहान मुले राहतात. शुक्रवारी दुपारी शेजारील वृध्द महिला पाटील यांच्या घरी आली असता, चौघेही निपचिप पडलेले दिसले. तिने आरडाओरडा करत शेजार्यांना बोलावले. घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरामध्ये पाहणी केली असता, चार ग्लास आढळले. तसेच कापून ठेवलेला लिंबू आणि सुरी व बाजूला जनावरांसाठी वापरले जाणारे औषध आढळून आले. त्यामुळे चौघांनीही विषारी द्रव्य प्राशन केले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. समीर पाटील यांना सहा वर्षांचा एक आणि दोन महिन्यांचा एक, अशी दोन मुले आहेत. सुदैवाने ही दोन्हीही मुले बचावली. सर्वांना कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र रमेजा पाटील आणि काजल पाटील यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अल्लाउद्दीन पाटील व समीर पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनेची माहिती समजताच जत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, निरीक्षक जोतिराम पाटील यांनी तातडीने कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात तसेच नांगोळे येथे घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
अल्लाउद्दीन पाटील यांच्या घराशेजारी पंधरा दिवसांपूर्वी करणीचा प्रकार उघडकीस आला होता. घराभोवती वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करण्यात आली होती. सुई टोचलेला लिंबू, बाहुली, हळद-कुंकू-गुलाल, असे घराभोवती टाकण्यात आले होते. त्यामुळे करणीची चर्चा गावात सुरू होती.
या घटनेबाबत शुक्रवारी दिवसभर परिसरात आणि तालुक्यात चर्चेचा विषय होता. नांगोळेत मात्र, या कुटुंबाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. कवठेमहांकाळ पोलिसांनी या दिशेनेही तपास सुरू केला असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
दरम्यान, पाटील कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबतचे कारण मात्र अस्पष्ट असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी दिली. काही दिवसांपूर्वी घराजवळ लिंबू, सुई, हळद, कुंकू टाकण्यात आल्याने पाटील कुटुंबीय भीतीच्या छायेखाली होते, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.