

कवठेमहांकाळ : तालुक्यातील तिसंगी येथे दगडाने ठेचून सुनील शिंदे (वय 30) यांचा खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन संशयितांना अटक केली. एक संशयित अद्याप फरार आहे.
सोमवारी (दि. 8) सकाळी घाटनांद्रे - तिसंगी रस्त्यालगत शेतात सुनील शिंदे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती समोर आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार, कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. मालगाव - मिरज रस्त्यावर सापळा रचून संशयित अभिजित सर्जेराव जांभळे (वय 19, रा. गुंडेवाडी) व विनायक ऊर्फ बंडू बाळू मोहिते (35, रा. मंगसुळी, ता. अथणी) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांचा साथीदार प्रभू तळगडी हा फरार आहे. विनायक मोहिते याने सुनील शिंदे यांच्या बहिणीसोबत दुसरे लग्न केले होते. या कारणावरून सुनील त्याला वारंवार धमक्या देत होता.