

मिरज : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत तगडा पोलिस बंदोबस्त आहे. पोलिस अधीक्षकांसह सात वरिष्ठ अधिकारी, 95 निरीक्षक दर्जाचे अधिकारी, 550 पोलिस कर्मचारी, 300 होमगार्ड आणि दंगल नियंत्रणाची दोन पथके असा बंदोबस्त आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत मिरजेत बंदोबस्त कामकाजाचे वाटप करण्यात आले.
शनिवारी, रविवारी दोन दिवसोत मिरजेत गणेश विसर्जन मिरवणूक चालणार आहे. मंगळवारी ईद साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त आहे. पोलिस अधीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनासाठी मिरजेतील बालगंधर्व येथे बंदोबस्त वाटप पार पडले. पोलिस अधीक्षक घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर उपस्थित होते. बंदोबस्तासाठी उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, प्रफुल्ल पाटील, सचिन थोरबोले, प्रभाकर मोटे, विमला एम. यांच्यासह 17 पोलिस निरीक्षक, 78 सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, 550 पोलिस कर्मचारी, 300 होमगार्ड, दंगल नियंत्रणची दोन पथके आहेत. दरम्यान, यापूर्वी मिरज शहरातून पोलिसांनी संचलन केले आहे. यावेळी प्रत्येकाला नेमून दिलेल्या कर्मचार्याने कोणत्याही परिस्थितीत पॉईंट न सोडण्याचा सूचना देण्यात आल्या. प्रत्येक कर्मचार्याला मंडळ दत्तक दिले आहे. संबंधित मंडळे लवकरात लवकर विसर्जन मार्गावर आणण्याची जबाबदारी त्या कर्मचार्याला दिली आहे. न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करणार्या मंडळांवर कडक कारवाई करण्यात येईल. अशा मंडळांना जागेवर नोटीस बजाविण्यात येणार आहेत. विसर्जन मार्गावर आणि विसर्जनस्थळी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.
गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोर्या करणार्या चोरट्यांचा प्रत्येकवर्षी सुळसुळाट असतो. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस आहेत. सराईत गुन्हेगारांना यापूर्वीच हद्दपार केले आहे. परंतु तरीही अशा घटना टाळण्यासाठी गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत.
महाराणा प्रताप चौक ते गणेश तलाव हा मुख्य विसर्जन मार्ग आहे. या मार्गावर गुरुवार पेठ, स्टँड रस्ता, हायस्कूल रस्ता, तांदूळ मार्केट, लोणी बाजार या मार्गावरून गणपती मुख्य मार्गावर येतात. दरम्यान, महाराणा प्रताप चौक ते गणेश तलावापर्यंत जोडणारे उपरस्ते बॅरिकेटिंग करून बंद आहेत. तसेच, दोरखंडही बांधण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर गर्दी होऊ नये यासाठी एक-एक मंडळ विसर्जन मार्गावर सोडण्यात येणार आहे.