

आष्पाक आत्तार
वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील स्थानिक नागरिकांनी आपल्या व्याघ्र अभिमानाचे दर्शन घडवत वाघांना ‘सेनापती’, ‘सुभेदार’ व ‘बाजी’ अशी लोकप्रिय नावे दिली आहेत. यामुळे स्थानिकांचा वाघांशी असलेला आत्मीय संबंध अधिक दृढ झाला असून, संवर्धनाबरोबरच लोकसहभागाची भावना बळकट झाली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करणार्या वाघांचे नामकरण करण्यात आले आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या विविध पदव्यांचा आधार घेण्यात आला आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सांकेतिक क्रमांक देण्यात येतात. मात्र पर्यटकांमध्ये वाघाविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी, गाईड आणि वनमजुरांकडून या वाघांसाठी वापरण्यात येणार्या नावांना वन विभागाने स्वीकारले आहे.
सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन नर वाघ आहेत. 2018 सालानंतर 2023 मध्ये 17 डिसेंबररोजी पाच वर्षानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची नोंद झाली. या वाघाची ओळख न पटल्याने त्याचा सांकेतिक क्रमांक ‘एसटीआर-टी 1’ असा देण्यात आला. कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये दि. 23 एप्रिल 2022 रोजी पहिल्यांदाच टिपलेला आणि दि. 13 एप्रिल 2024 रोजी त्या ठिकाणीच राहिलेला नर वाघ हा 100 किलोमीटर दूर असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी टिपला गेला. त्याचा सांकेतिक क्रमांक ‘एसटीआर-टी 2’ असा ठेवण्यात आला आहे. त्यानंतर 2023 साली कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात टिपलेला नर वाघ 2025 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आल्यामुळे त्याला ‘एसटीआर-टी 3’ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला. हाच वाघ कोकणात चिपळूण वनपरिक्षेत्रातदेखील जाऊन आला होता.
सध्या ‘एसटीआर-टी 1’, ‘एसटीआर-टी 2’ हे दोन वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये असून ‘एसटीआर-टी 3’ हा वाघ कोयना वन्यजीव अभयारण्यात आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये या वाघांची ओळख सांकेतिक क्रमांकानुसार आहे. मात्र स्थानिक पातळीवर पर्यटकांमध्ये या वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी त्यांना नावे देण्यात आली आहेत ‘एसटीआर- टी 1’ या वाघाला ‘सेनापती’, ‘एसटीआर-टी 2’ या वाघाला ‘सुभेदार’ आणि ‘एसटीआर-टी 3’ या वाघाला ‘बाजी’ असे नाव देण्यात आले आहे.