

सांगली : महापारेषणच्या गुणवत्ता यादीत नाव आणण्यासाठी एका लिपिकासह त्यांची मुलगी व जावयाकडून 11 लाख 40 हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिलावर हसन नदाफ (रा. पोळ मळा, त्रिमूर्ती कॉलनी, शंभर फुटी रस्ता, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवाजी अर्जुन सलगर (रा. सनमडी, ता. जत) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी, फिर्यादी दिलावर नदाफ हे एका संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मुलीने महापारेषणची परीक्षा दिली होती. दरम्यानच्या काळात दिलावर यांची संशयित शिवाजी सलगर याच्याशी ओळख झाली. त्याने सलगी वाढवून दिलावर, त्यांचे जावई आणि मुलगी शाहीन यांचा विश्वास संपादन केला. महापारेषणच्या परीक्षेत शाहीन यांचे नाव गुणवत्ता यादीत हमखास आणण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील, असे सांगितले.
काम होणार असल्याने दिलावर यांच्यासह त्यांची मुलगी शाहीन आणि जावई यांनी संशयित शिवाजी सलगर यांना वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात 11 लाख 40 हजार रुपये दिल; परंतु गुणवत्ता यादीत नाव न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संशयिताकडे पैसे परत मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिला. फसवणुकीचा प्रकार 13 जानेवारी ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घडला. याप्रकरणी दिलावर यांनी आर्थिक गुन्हे शाखेत फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर सलगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.