मिरज : मिरज-बेडग रस्त्यावर बोलवाड आडवा फाटा येथे भरधाव मोटार उलटून झालेल्या भीषण अपघातात बोलवाड (ता. मिरज) येथील तिघे जागीच ठार झाले, तर अपघातात मोटारचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना सोमवार, दि. 28 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
मृतांमध्ये राजू बोजगार (वय 41), दस्तगीर शेख (31) आणि बंदेनवाज सय्यद (32, सर्व रा. बोलवाड, ता. मिरज) यांचा समावेश आहे, तर मोटारचालक इरफान नाईकवाडी याची प्रकृती चिंताजनक आहे. वरील सर्वजण बोलवाड येथील रहिवासी असून त्यांच्या नात्यातील मुलीचा बेडग येथे विवाह होता. हा विवाह आटोपून सर्वजण बोलवाड येथे परतले होते; परंतु सायंकाळी सर्वजण पुन्हा बेडगकडे निघाले होते. यावेळी मिरज-बेडग रस्त्यावरील बोलवाड फाट्याजवळ त्यांची मोटार आली असता चालक इरफान नाईकवाडी याचा मोटारीवरील ताबा सुटला.
अचानक मोटार पाच ते सहा कोलांट्या घेत रस्त्यावर उलटली. या अपघातात राजू बोजगार, दस्तगीर शेख आणि बंदेनवाज सय्यद हे तिघे जागीच ठार झाले, तर चालक इरफान गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळाचा पंचनामा करून मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे बोलवाड गावावर शोककळा पसरली आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
अपघातग्रस्त मोटारीतील सर्व तरुण हे बोलवाड येथील आहेत. सोमवारी सकाळी नात्यातील मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी सर्वजण बेडग (ता. मिरज) येथे गेले होते. विवाह आटोपून दुपारी ते गावी परतले होते. पण, सायंकाळी सर्वजण पुन्हा बेडग येथे विवाहस्थळी निघाले होते. यावेळी हा अपघात झाला. सकाळी मोठ्या धडाक्यात विवाह पार पडला; पण सायंकाळी घडलेल्या अपघातात झालेल्या तिघांच्या मृत्यूमुळे बोलवाडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.