

शिराळा शहर : एकीकडे गवताची पेंढी कापली म्हणून मारामार्या, खून अशी परिस्थिती भावकीत सुरू असताना गेल्या तीन पिढ्यांचा जमीन वाटपाचा दावा सुटला. ही सुखावह व समाजाला दिशा देणारी घटना रिळे (ता. शिराळा) येथे झाली.
शिराळा येथील लोकन्यायालयात 49 वारसांच्या संमतीने तडजोडीने हा वाद संपुष्टात आला. रिळे (ता. शिराळा) येथील तीन पिढ्यांपूर्वीचे कृष्णा, बाळा, हरी, खंडू, असे माने-पाटील भावकीतील चार भाऊ. यापैकी कृष्णा मोठे असल्याने सर्व जमीन एकत्र कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्या नावावर होती. यानंतर पुढच्या पिढीत ही नावे वारसा हक्काने लागली. बाकी तीन भावांची 7/12 ला नावेच नव्हती. यामुळे वाटपाबद्दल सतत भांडणे होत होती. या तिसर्या पिढीतील एक वारसदार, राजू गोविंदराव पाटील (वय 58) यांनी एकूण 49 वारसांना एकत्र करून स्वतः वादी होऊन शिराळा न्यायालयात इतरांना प्रतिवादी करून वाटणीपत्रकाबाबत दावा दाखल केला. 95 वर्षांच्या वृध्दापासून 20 वयोगटातील तीन पिढ्यांतील 49 वारसांना शिराळा येथील लोकन्यायालयात प्रत्यक्ष आणून हा वाद तडजोडीने मिटवला गेला. विशेष म्हणजे या कुटुंबातील चौदा महिलांनी या जमिनीवरील हक्क या तडजोडीत सोडून दिला.
काही वारस हे गुजरात, पुणे, मुंबई येथून आले होते. अनेक वर्षे काही जणांच्या भेटी झाल्या नव्हत्या. या निमित्ताने पुन्हा एकत्रित आल्याने सर्वांनी एकत्र बसून सहभोजनही केले. गप्पागोष्टी झाल्या. सर्वांनी मूळ गावी रिळे येथे जाऊन देवाचे दर्शन घेतले. आणि भविष्यात सुख-दुःखात एकत्र येण्याचा संकल्प केला. आजपर्यंत एकमेकाचे तोंडही न पाहिलेले भाऊबंद डोळ्यात पाणी आणून एकमेकांना आलिंगन देत होते. निरोपाच्या वेळी सर्वांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. वाद मिटल्याबद्दल ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले. अशाप्रकारे वडिलोपार्जित जमिनीचा तीन पिढ्यांचा वाद राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये यशस्वीपणे मिटला.
शिराळा येथे 22 मार्च 2025 रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये रे.दि.मु.नं. 33/2025 या दाव्यामध्ये तडजोड करण्यात आली. संबंधित दाव्यामध्ये राजू गोविंदराव पाटील वगैरे 1 विरुध्द पांडुरंग बंडू पाटील वगैरे 36 यांच्यातील वडिलोपार्जित तीन पिढ्यांचा जमिनीचा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. पिढ्यान्पिढ्या सुरू असलेला वाद मिटल्याचे समाधान सर्वांनी व्यक्त केले. हा वाद हा राष्ट्रीय लोकअदालतीचे पॅनेल प्रमुख शरद सुरजुसे, दिवाणी न्यायाधीश (क) स्तर, शिराळा व पॅनेल सदस्य अॅड. जी. एल. पाटील, कायदेतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे मिटविण्यात आला. वादीतर्फे शिराळा बार असोसिएशनचे अॅड. व्ही. व्ही. साळुंखे यांनी, तर प्रतिवादीतर्फे अॅड. पी. आर. गोसावी यांनी काम पाहिले.