

सांगली : विश्रामबाग परिसरातील हसनी आश्रम येथील फॅक्टरीतील चोरीचा छडा लावण्यात विश्रामबाग पोलिसांकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. या चोरीप्रकरणी पोलिसांनी तिघांना जेरबंद करत सव्वालाखाचा ऐवज हस्तगत केला. निखिल मिरासाब माडीग (वय 21, रा. शांतिनगर, मद्रासी कॉलनी, सांगली), अनिकेत आकाश साबळे (वय 23, रा. 100 फुटी रस्ता वीज कार्यालयामागे, शाहुनगर, सांगली) आणि राजू अशोक सोनावले (वय 23, रा. 100 फुटी रस्ता, नुरानी मशिदीजवळ, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, हसनी आश्रम येथे सतीश बाबासाहेब शिंदे (वय 56, रा. गव्हर्न्मेन्ट कॉलनी, सांगली) यांचा कारखाना आहे. दि. 16 जुलै रोजी चोरट्यांनी या कारखान्यात प्रवेश करून 26 हजार 130 रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत चोरट्यांचा माग काढला. संशयित तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी ही चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेला माल निखिल माडीग याच्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन दुचाकींसह कॉपर वायर असा एक लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी व्यक्त केली.
ही कारवाई निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन माने, उपनिरीक्षक कार्वेकर, दिनेश माने, संदीप साळुंखे, अमर मोहिते, बिरोबा नरळे, महंमद मुलाणी, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, सचिन घोदे, सुनील शिंदे यांच्या पथकाने केली.