

सांगली : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने बोलावून पोलिसाचा छापा पडल्याचे सांगत पुण्यातील शेअर दलालाची फसवणूक केल्याप्रकरणी लिंगनूर (ता. मिरज) येथील तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केली. संशयित लक्ष्मण श्रीकांत नाईक (वय 39, रा. पाण्याच्या टाकीजवळ, लिंगनूर), नीलेश तुकाराम चौगुले (वय 29, रा. चौगुले मळा, लिंगनूर), अर्जुन शिवाजी पाटोळे (वय 26, रा. पाण्याच्या टाकीजवळ, सुभाषनगर, मिरज) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
शेअर दलाल यश दीपक रडे (वय 24, सध्या रा. वारजे, पुणे, मूळ रा. जळगाव) यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली होती. यश रडे यांच्यासह दोघांशी संपर्क साधून संशयित लक्ष्मण नाईक याने आपल्याकडे स्वस्तात सोने असल्याचे सांगितले. रडे हे सोने खरेदीसाठी लिंगनूर येथे आल्यानंतर नाईक याने त्यांना ‘आता सोने उपलब्ध नसून आल्यानंतर कळवतो’, असे सांगून परत पाठवले. त्यानंतर पुन्हा सोने आल्याचे सांगून रक्कम घेऊन येण्यास सांगितले. यश रडे 25 लाख रुपये घेऊन सोने खरेदीसाठी लिंगनूर येथे आले. तेथे दोघेजण पोलिसांच्या वेशात आले. पोलिस आल्याचा बहाणा करून रडे यांच्याकडील 25 लाखाची रोकड घेऊन दोघेजण निघून गेले. तेव्हा लक्ष्मण याने रडे यांना ‘तुमची रक्कम परत मिळवून देतो’, असे सांगून परत पाठविले. परंतु त्यानंतर रक्कम दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दि. 21 जून रोजी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी या लुटीचा छडा लावण्याचे आदेश सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाला दिले. या पथकातील सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला यांना लक्ष्मण नाईक व त्याचे साथीदार लिंगनूर-खटाव रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने लिंगनूरला धाव घेत तिघांना ताब्यात घेतले. लक्ष्मण याने दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. तिघांना मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे व पथकाने कारवाई केली.
गेल्या काही दिवसापासून मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचा कारभार वादग्रस्त ठरला आहे. फिर्यादीने रोकड फसवणूकप्रकरणी संशयितांची नावे स्पष्ट केली होती, पण संशयित मिरज ग्रामीण पोलिसांच्या हाती लागले नाहीत. उलट एलसीबीच्या पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्याने मिरज ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.?