

सांगली ः जेईइी मेन या अभियांत्रिकी परीक्षचे फॉर्म भरताना जातीच्या दाखल्याची सक्ती केली जात आहे. पण सध्या प्रशासन निवडणूक कामात असल्याने दाखले मिळणे मुश्कील झाले आहे. फॉर्म भरण्याची मुदत 22 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी अडचणीत आले आहेत. पालक व विदद्यार्थी हवालदिल झाले आहेत. सरकारने मुदत वाढविण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी दरवर्षी देशातील सुमारे 12 ते 13 लाख विद्याथी ही परीक्षा देतात. महाराष्ट्रातील 3 ते 4 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. ही परीक्षा मेन व अॅडव्हॉन्स अशा दोन पातळीवर असते. देशात गेल्या काही महिन्यात नीट व लोकसेवा आयोगाच्या परीक्षात अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आले. त्यामुळे एनटीएने सर्वच परीक्षांसाठी नियम कडक केले आहेत. प्रामुख्याने जाती, अपंगत्वाचे दाखल्यांची मूळ प्रत अगोदरच मागितली जात आहे. आता जेईइीसाठीही जातीचा दाखल्याचा क्रमांक, तारीख, प्रमाणपत्र देणार्या प्रशासकीय अधिकार्याचे पद ही माहिती भरणे बंधनकारक केले आहे.
अचानक हा निर्णय दिल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली आहे. कारण निवडणुकीमुळे सर्व प्रशासकीय अधिकारी व्यस्त आहेत. परिणामी दाखले मिळणे मुश्कील झाले आहे. पालक हेलपाटे मारून थकले आहे.त्यातच फॉम भरण्याची मुदत 22 नोव्हेंबरपर्यत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हजारे विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. दाखला मिळाला नाही तर विद्यार्थ्यास खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागेल व त्याची टक्केवारी खूप जादा असते. सरकारने याची दखल घेवून दाखले देण्याबाबत आदेश द्यावेत. तसेच फॉर्म भरण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी होत आहे.