

आटपाडी : कधी टिंगल, कधी उपेक्षा, तर कधी समाजाच्या कटाक्षांना सामोरे जात केलेला प्रवास आणि अखेर जनतेच्या मतांनी सन्मानित झालेला क्षण! विठलापूर पंचायत समिती गणात तृतीयपंथी दिलीप अण्णा हेगडे यांनी 2454 मतांच्या भक्कम आघाडीने विजय मिळवत संघर्षाचे सोने केले. दिलीपच्या परडीत विजयाचे दान पडले. हा निकाल पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा ठरला.
दिघंची जिल्हा परिषद गटातील या लढतीत केवळ राजकीय समीकरण नव्हते; तर तो स्वाभिमानाचा, अस्तित्वाचा आणि स्वीकाराचा प्रश्न होता. शिवसेना शिंदे गटाने दाखवलेला विश्वास आणि मतदारांनी दिलेला कौल यामुळे हा निकाल इतिहासात नोंदला गेला. यापूर्वी आवळाईच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड होऊन दिलीप हेगडे यांनी समाजातील भिंतींना तडा दिला होता. आता पंचायत समिती सदस्य म्हणून निवड होताच, त्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू हे केवळ वैयक्तिक आनंदाचे नव्हते; तर अनेक वर्षांच्या वेदना आणि संघर्षाचे प्रतीक होते. या विजयामागे सुहास बाबर यांचे मार्गदर्शन, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला. ‘संधी दिलीत, म्हणून आज समाजासमोर उभा राहू शकलो,’ असे सांगताना हेगडे यांचा आवाज भरून आला होता.