Miraj Crime : मिरजेत शेजारील घरात चोरी करणाऱ्यास अटक

२ लाख ३७ हजारांचा ऐवज जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
Miraj Crime News
मिरजेत शेजारील घरात चोरी करणाऱ्यास अटकpudhari photo
Published on: 
Updated on: 

सांगली : मिरजेतील पंढरपूर रस्त्यावरील अयोध्यानगर येथे शेजारील बंद घर फोडून लाखो रुपयांचे दागिने व रोकड चोरणाऱ्या कैस मुबारक बोजगार (वय २७, रा. गोसावी गल्ली, पंढरपूर रस्ता, मिरज) या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ६७ हजार रुपयांची रोकड व ७० हजार ९८० रुपयांचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिरजेतील पंढरपूर रस्त्यावरील अयोध्यानगर येथील अजिंक्य चंद्रकांत जगताप हे २० ऑक्टोबर रोजी कुटुंबासह नवरात्रोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. त्या संधीचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या कैस बोजगार याने जगताप यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप दगडाने तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. दुसऱ्या दिवशी पहाटे जगताप घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याप्रकरणी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली होती.

घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन केले. तपास सुरू असताना, पथकातील अमिरशा फकीर व संदीप नलावडे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार कैस बोजगार याच्याकडे चोरीचे दागिने असून तो ते विक्रीसाठी पंढरपूर रस्त्यावरील बालाजी मंगल कार्यालयासमोर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

पथकाने तत्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता खिशात सोन्याचे दागिने व पिशवीत रोकड आढळून आली. त्याने शेजारील जगताप यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पूर्वीही गुन्हे दाखल आहेत. कारवाईनंतर त्याला मुद्देमालासह मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे व सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुभाष सूर्यवंशी, मच्छिंद्र बर्डे, सतीश माने, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, सागर लवटे, अमर नरळे, दरीबा बंडगर, मोतिराम खोत, नागेश खरात व राजाराम मुळे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.