

कवठेमहांकाळ : आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या तीन महिलांना कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 33 हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. याबाबतची फिर्याद संपदा संतोष कोळेकर (वय 27, रा. जाखापूर) यांनी दिली होती.
दि. 6 रोजी संपदा कोळेकर या मुलासह यात्रेसाठी आल्या होत्या. गर्दीत मुलाच्या गळ्यातील सोने चोरट्यांनी लंपास केले. त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. हवालदार श्रीमंत करे, सिध्दराम कुंभार, अभिजित कासार यांना संशयित सलगरे यात्रेत असल्याची माहिती मिळाली. पथकास सलगरे येथील सिध्दनाथ मंदिराजवळ तीन महिला संशयितरित्या फिरताना दिसून आल्या. वैशाली शिवाजी जाधव (वय 28), सोनाली रवी जाधव (वय 28), माधुरी लक्ष्मण डुकळे (वय 24, रा. चंदननगर, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मुद्देमाल आढळून आला.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, सहायक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली. तपास हवालदार मनोज पाटील करीत आहेत.