कृष्णेमध्ये होड्यांच्या शर्यतींचा थरार; सप्तर्षी बोट क्लब अजिंक्य
केशवनाथ उत्सव मंडळाच्या वतीने रविवारी कृष्णा नदीपात्रात घेण्यात आलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये कवठेपिरान येथील सप्तर्षी बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये एकूण 13 होड्यांनी भाग घेतला. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक सांगलीवाडीतील रॉयल कृष्णा बोट क्लबने, तर तृतीय क्रमांक समडोळी येथील न्यू शानदार बोट क्लबने मिळवला. चतुर्थ कवठेसार येथील सह्याद्रीने व पाचवा क्रमांक कसबे डिग्रज येथील श्रीजी बोट क्लबने मिळवला. सायंकाळी 6 वाजता ही स्पर्धा पाहण्यासाठी नदीचे दोन्ही घाट गर्दीने फुलून गेले होते. आयर्विन पुलावरही प्रचंड गर्दीने वाहतूक खोळंबली होती.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष उद्योजक प्रदीप दडगे, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी व हिंदकेसरी विनोद दादू चौगुले, सामाजिक कार्यकर्ते किशोर लुल्ला आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी महेश मगदूम, राजकुमार मगदूम, विश्लेश्वर मगदूम, प्रशांत चुकारे, विश्वनाथ महाजन आदींनी पंच म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन राजकुमार मगदूम यांनी केले, तर आभार विश्वेश्वर मगदूम यांनी मानले.

