

सांगली : खोटे लग्न लावून गंडा घालणार्या टोळीने राज्यभरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे अनेकांना फसवल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीतील पल्लवी मंदार कदम तथा परवीन मोबीन मुजावर (रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर) हिने धुळे, शिरूर आणि कर्नाटकातील निपाणी येथील अनेकांची खोटी लग्ने लावून फसवणूक केली आहे. तेथील पोलिसांनी संजयनगर पोलिसांशी संपर्क साधला आहे. सध्या फसवणूक करणार्या टोळीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खोटे लग्न लावून फसवणूक करणार्या दोन टोळ्यांचा संजयनगर पोलिसांनी नुकताच छडा लावला आहे. एका टोळीने सांगलीतील एका तरुणाची फसवणूक केली आहे. संशयित पल्लवी मंदार कदम तथा मूळ नाव परवीन मोबीन मुजावर (रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर) हिचे पहिले लग्न झाले असताना तिचे एकाशी दुसरे लग्न लावण्यात आले. मूळ नाव परवीन मुजावर असताना तिने पल्लवी कदम अशी स्वत:ची ओळख सांगितली होती. लग्न लावून देण्यासाठी एजंट राणी ऊर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार (रा. पंचशीलनगर, सांगली), राधिका रतन लोंढे (रा. न्यू इंग्लिश स्कूलजवळ, मिरज), सुमन दयानंद वाघमारे (रा. वैरण बाजारजवळ, मिरज) आणि नाईक नामक महिला (रा. कलानगर, सांगली) यांनी पुढाकार घेतला होता.
फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या तरुणाने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून चौघींना अटक करण्यात आली होती. दरम्यान परवीन मुजावर हिने सांगलीतील तरुणाबरोबरच धुळे, निपाणी आणि शिरूर येथेही खोटे लग्न करून फसवणूक केल्याचा प्रकार आता पोलिस तपासात उघडकीस आला आहे. तेथील पोलिसांनी संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. सध्या फसवणूक करणार्या टोळीची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर कारागृहात रवानगी केली आहे. लवकरच धुळे, शिरूर आणि निपाणी पोलिस चौकशीसाठी परवीन मुजावर हिचा ताबा घेण्याची शक्यता आहे.