

सांगली : तेलदरात सातत्याने वाढ होत असताना आता अचानक घट झालेली आहे. त्यामुळे ग्राहकवर्गाला थोडा दिलासा मिळाला. तेल दर किलोमागे 20 रुपयांनी तर 15 किलोच्या डब्यामागे 100 रुपयांनी घटला आहे. मागणीतली घट आणि मंदीमुळे खाद्यतेलांचे दर कमी होण्याची चिन्हे आहेत.
नव्या वर्षात तेलदरात वाढ होण्याची शक्यता तेल व्यापार्यांनी वर्तवली आहे. सध्या पामतेलावर आयात कर वाढल्याने पामतेलाचे दर मात्र चढे आहेत. हिवाळ्यात पामतेलाची मागणीही घटते. सरकी, सूर्यफूल, सोयाबीन तेलाची मागणी वाढते. जिल्ह्यात रोज अंदाजे 100 टन तेलाची उलाढाल होते, वर्षभरात तेल दरात 15 किलोच्या डब्यामागे सुमारे हजार रुपयांची वाढ झाली. पहिल्यांदाच तेल दर घटले आहेत. लग्नसराईचे दिवस असल्यामुळे तेलाचा वापर थोडाफार तरी वाढतो. अवकाळी पावसामुळे तेलबियांचे घटलेले उत्पादन यामुळे तेल महागले होते. मात्र वर्षाच्या शेवटी तेलदराने थोडा दिलासा दिला. अर्थात किलो किंवा लिटरमागे दहा रुपये कमी झाल्याचे समाधान ग्राहकाला असतेच. दिवाळीनंतर लग्नसराईला प्रारंभ होतो त्यामुळे सगळ्याच तेलांची मागणी वाढते. परंतु यंदा मागणीत घटच झाली आहे.