सांगली : पुढारी वृत्तसेवा
दोन, चार वर्षांपूर्वी मागणीच्या प्रमाणात केवळ 50 टक्केच उमेदवार येणार्या होमगार्ड (गृहरक्षक दल) भरतीला आज बुधवारी मात्र अगदी जत्रेचे स्वरूप आले होते. 632 जागेसाठी अगदी आठ हजार युवक आले होते. भत्त्यामध्ये वाढ व पोलिस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आल्यामुळे ही गर्दी झाल्याची माहिती भरती अधिकार्यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील 632 जागेच्या गृहरक्षक दलाच्या भरतीसाठी आज बुधवारपासून येथील पोलिस मुख्यालयात प्रारंभ झाला. ही भरती प्रक्रिया अतिरिक्त पोलिस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही भरती प्रक्रिया चार दिवस सुरू आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. प्रत्यक्षात 7 हजार 766 उमेदवार आले होते. रोज तीन हजार जणांची चाचणी घेण्यात येत आहे.
होमगार्ड भरती एक नजर...
शैक्षणिक पात्रता दहावी
वय : 18 ते 50 वर्षे, निवृत्ती 58
शारीरिक चाचणी छाती 79 सेमी. उंची 162 सेंमी,
सोळाशे मीटर धावणे, गोळा फेक, लेखी, तोंडी परीक्षा नाही
भरतीसाठी पोलिस कर्मचारी नियुक्त 150
बंदोबस्त भत्ता प्रतिदिन : 670 रुपये
गणवेश, बूट व स्वच्छता भत्ता
या वर्षापासून गृहरक्षक दलाचा भत्ता प्रतिदिन 670 रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी हा भत्ता 400 रुपये होता. अर्थात हा भत्ता केवळ बंदोबस्त असला तरच देण्यात येणार आहे. इतर दिवशी त्यांनाही काहीही वेतन नाही. त्याचबरोबर या वर्षापासून पोलिस भरतीमध्ये गृहरक्षक दलाला पाच टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यामुळे यावर्षी होमगार्डच्या भरतीसाठी मोठी गर्दी झाली आहे.
होमगार्ड भरतीला मोठ्या संख्येने युवक आले आहेत. यामध्ये 6 हजार 763 पुरुष, तर 914 महिलांचा समावेश आहे. यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त व नियोजन करण्यात आले आहे. आगामी चार दिवसांत भरती प्रक्रिया पूर्ण करून निवड यादी जाहीर करण्यात येईल.
- रितू खोखर अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सांगली