

मिरज : एकेकाळी येथील स्वच्छ पाण्याचा तलाव म्हणून लौकिक असलेला ऐतिहासिक गणेश तलाव आता दूषित झाला आहे. या तलावातील आणि काळ्या खणीतील मासे वारंवार का मरतात? याचा शोध अद्याप महापालिकेला लागलेला नाही. त्याचा शोध कधी लागणार? असा खडा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
1796-97 मध्ये दुष्काळ पडला होता. दुष्काळात जनतेला कामे मिळावीत, म्हणून मिरजेत काही कामे हाती घेण्यात आली होती. तत्कालीन श्रीमंत गंगाधर गोविंद पटवर्धन यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलाव व गणेश मंदिरही याच कालावधीत बांधण्यात आले. श्रीमंत गंगाधरराव गोविंद यांनी गणेश तलाव व गणेश मंदिर सुमारे 40 हजार रुपये खर्चून बांधले. त्याकाळी शहरातील बर्याच विहिरींना या गणेश तलावातील पाण्याचा पुरवठा मिळत होता. अतिशय स्वच्छ पाण्याचा तलाव म्हणून तलाव प्रसिद्ध होता. आता या तलावाच्या दूषित पाण्याचीच चर्चा नेहमी होते.
मिरजेत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरगुती गणेशमूर्ती असो किंवा सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती असोत, सर्व मूर्ती याच तलावात विसर्जन करण्याची परंपरा आहे. वर्षानुवर्षे मूर्तींचे विसर्जन होत असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. 2004 पासून गणेश तलावामध्ये मासे, कासवे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे या तलावातील गाळ काढून पाणी स्वच्छ करण्याची मागणी जनतेतून होत होती. या मागणीसाठी अनेकांनी आंदोलने केले. काहींनी तर तलावातील पाण्यात उभे राहून आंदोलन केले. त्यानंतर महापालिकेने गाळ काढण्याचा निर्णय घेऊन 2008 मध्ये हा गाळ काढून तलाव स्वच्छ केला. त्यानंतर आलेल्या गणेशोत्सवामध्ये गणेशमूर्ती कृष्णाघाट येथे नदीत विसर्जन होऊ लागल्या. नंतर तलावात पाणी साचल्याने पुन्हा गणेशमूर्ती तलावात विसर्जित करणे सुरू झाले. गेली 14 वर्षे या तलावात मूर्तींचे विसर्जन होत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये या तलावातील मासे अनेकवेळा मृत्युमुखी पडले आहेत. मासे मेले की तेवढी तलावाची स्वच्छता केली जाते. पण नंतर पुन्हा मासे मरतात. गेल्या आठवड्यात सुमारे एक हजार किलो मासे मृत झाले. महापालिकेने पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविल्याचे सांगितले आणि पाण्यात योग्य ऑक्सिजनदेखील असल्याचे सांगितले. पाण्यात योग्य ऑक्सिजन आहे, तर मासे का मरतात ? याचा शोध महापालिका यंत्रणेला अद्याप लागलेला नाही. मासे मरण्यामागचे कारण महापालिका का शोधत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिरजेतील भारतनगर येथे जुनी काळी खण आहे. या खणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. तेथे सुशोभिकरण व्हावे, संरक्षक भिंत व्हावी, अशी नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यामुळे काळ्या खणीचे सुशोभिकरण व्हावे, यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे महापालिकेकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली. साडेचार वर्षांपूर्वी सुशोभिकरणासाठी 8 कोटी 65 लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे या काळ्या खणीचे सुशोभिकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
या काळ्याखणीमध्ये बोटिंग, बाजूने फिरण्यासाठी ट्रॅक, पथदिवे, बगीचा, रंगीत कारंजा, सोलर सिस्टिम, ग्रीन वॉल करण्यात येणार होते, मात्र हे काम अद्याप सुरू झालेले नाही. या काळ्या खणीच्या कामासंदर्भात एका आयुक्तांनी पाठपुरावा केला होता. पाहणीही केली. त्यानंतर तीन आयुक्त महापालिकेत येऊन गेले. त्या सर्व आयुक्तांनीही पाहणी केली, पण काम सुरू झाले नाही. आताच्या आयुक्तांनीही पाहणी करून चार महिने उलटून गेले. या कामाची आयुक्त केवळ पाहणी करतात, पण काम काही सुरू होत नाही, असा आरोप या परिसरातील नागरिकांचा आहे.
या काळ्या खणीचे पाणी वाढले आहे. हे पाणी हिरवे झाले आहे. त्यामुळे पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. या पाण्यामुळे गव्हर्न्मेंट कॉलनी येथील काही रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी अनेक घरांच्या कुंपणाच्या भिंती पडल्या आहेत. एका रहिवाशाचे तर बाजूचे स्नानगृह पडले आहे. त्यामुळे येथे संरक्षक भिंत बांधण्याचीही मागणी होत आहे.