कणकवली ः अजित सावंत
तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटमार्गाच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम जानेवारी-2024 मध्ये हाती घेण्यात आले होते. आतापर्यंत हे काम पूर्णत्वास नेऊन वाहतूक खुली करण्याबाबत पाचवेळा दिलेल्या डेडलाईन हुकल्या आहेत. आता जानेवारी 2025 ची डेडलाईन संबंधित ठेकेदार एजन्सीने जिल्हा प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या प्रारंभी तरी हे काम पूर्णत्वास जाणार का? हा प्रश्न आहे. सद्यस्थितीत दरडी कोसळणार्या भागाच्या बाजूने बेस्टवॉल, रस्त्याच्या खालच्या बाजूने रिटेनिंग वॉलसह अन्य कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. कोल्हापूर, सिंधुदुर्गवासीयांसह सर्वांचेच या घाटमार्गाच्या कामाच्या पूर्णत्वाकडे लक्ष लागले आहे.
कोकण व कोल्हापूर जोडणारा गगनबावडा घाट दरवर्षी कोसळणार्या दरडी, धोकादायक वळणे, खचणारा रस्ता आणि ढासळणार्या संरक्षक भिंतींमुळे डेंजर झोनमध्ये होता. जानेवारीपासून या घाटमार्गाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. 22 जानेवारीपासून या घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करून ती भुईबावडा घाटातून वळवण्यात आली. करूळमधील घाट पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत 11 कि.मी.चा हा घाटरस्ता असून माथ्यापासून 1 कि.मी. आणि पायथ्यापासून 2 कि.मी. अंतर सोडून 8 कि.मी.च्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. दोन्ही लेन धरून हा घाटमार्ग 7 मीटर रुंदीचा होणार आहे. या घाटमार्गातील 80 टक्के धोकादायक दरडी काढण्यात आल्या. त्याचबरोबर 65 नव्या मोर्या मार्गात टाकण्यात आल्या. आतापर्यंत या घाटमार्गातील 7 कि.मी.चे काँक्रिटीकरणाचे दोन्ही लेनचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
सुरुवातीला हा घाटमार्ग खुला करण्यासाठी 10 जूनची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र त्यावेळी हे काम पूर्ण न झाल्याने नवीन डेडलाईन देण्यात आली. त्यातच जुलैमध्ये झालेल्या धुवाधार पावसामुळे या घाटमार्गाच्या कामात अनेक अडथळे आले. डोंगरावरून पावसाचे धो-धो पाणी कोसळत असल्याने बेस्टवॉल, रिटेनिंग वॉलची कामे थांबली. त्यातच काही ठिकाणी संरक्षक भिंतीसह रस्ताही खचला, दरडीही कोसळल्या त्यामुळे हे काम आणखी लांबणीवर पडले. किमान गणेश चतुर्थीपासून तरी हे काम पूर्ण होवून घाटमार्ग वाहतूकीस खुला होईल असे वाटत होते, मात्र गणेश चतुर्थीचाही मुहूर्त हुकला. त्यानंतर दिवाळीपर्यंत तरी काम पूर्णत्वास जाईल असे अपेक्षित होते मात्र तोही मुहूर्त हुकला. आता डिसेंबर अखेरपर्यंत सर्व काम पूर्ण करून 15 जानेवारी 2025 पासून हा घाटमार्ग वाहतूकीस खुला करण्याची डेडलाईन ठेकेदार एजन्सीने महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे आता प्रलंबित कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. मात्र ही डेडलाईन तरी पाळली जाते का? हा प्रश्न आहे.
तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या 21 कि.मी. टप्प्यासाठी गतवर्षी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुमारे 249 कोटीचा निधी मंजूर केला होता. जानेवारी 2024 पासून या टप्प्यातील नाधवडे ते कोकिसरे रेल्वे फाटक दरम्यानच्या पाच कि.मी.मधील काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यातील एका लेनचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले तर दुसर्या लेनचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. तसेच घाटमार्गातील 9 कि.मी.च्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे तर उर्वरित 3 कि.मी.च्या काँक्रिटीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. दिवाळीनंतर नोव्हेंबरपासून या घाटमार्गातून ऊस वाहतूक सुरु होते, मात्र यंदा ऊस वाहतूकीला अन्य पर्याय शोधावा लागणार आहे.
तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर मार्गातील तळेरे ते नाधवडे आणि वैभववाडी ते करूळ-जामनगर या टप्प्यातील 12 कि.मी.च्या चौपदरी लेनसाठी 110 कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. हे कामही आता सुरू केले जाणार आहे. घाटमार्गाचे काम करणार्या एजन्सीलाच हे काम मिळाले आहे. डिसेंबर 2025 पर्यंत तळेरे ते गगनबावडा-कोल्हापूर हा मार्ग पूर्णत्वास येईल, असा विश्वास महामार्ग प्राधिकरणने व्यक्त केला आहे.