सांगली : विवेक दाभोळे
जूनमध्ये ऐन पेरणीच्या काळात पावसाची दांडी, थंडीत कमालीचा उकाडा आणि जोडीला अवकाळी पाऊस आणि गारपीट, तर उन्हाळ्यात धुके या बदललेल्या आणि सामान्यांना चक्रावून सोडणार्या बदलत्या ऋतुमानाचा सर्वांनाच अनुभव येऊ लागला आहे; मात्र या बदलत्या हवामानाचा प्रामुख्याने शेतीलाच मोठा फटका सोसावा लागत आहे.
या सार्यांचे मूळ हे ग्लोेबल वार्मिंग अर्थात वाढत्या जागतिक तापमानातच आहे; मात्र याचा सर्वाधिक फटका हा शेती आणि शिवारालाच बसू लागला आहे. आपल्या शेतीचा सर्वाधिक भाग मोसमी पावसावर अवलंबून आहे. काही वर्षांपासून वातावरण बदलाचा शेतीला मोठा फटका बसू लागला आहे. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
पावसाचे लांबलेले आगमन, अनपेक्षित येणारे नद्यांचे पूर, अवकाळी पाऊस, ऐन कोजागरीच्या रात्री पडलेला मुसळधार पाऊस या घटना निसर्गचक्र बिघडल्याचे दाखवतात. हा ‘ग्लोबल वार्मिंग’चाच दुष्परिणाम आहे आणि यात शेतकर्याचाच बळी जाऊ लागला आहे. खरे तर शेती उत्पादनामध्ये चढ-उतार होण्याचे मुख्य कारण अतिशय कमी पाऊस किंवा अतिवृष्टी हे ठरत आहे.
अतिआर्द्रता, बदलते तापमान, रोग आणि किडींचा प्रकोप, अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, गारपीट ही कारणेही जोडीला आहेतच. मुळात यातून अतिवृष्टी आणि अवर्षण या गोष्टी शेतीसाठी शाप ठरत आहेत. गेल्या काही वर्षांमधील कमी पावसामुळे जे दुष्परिणाम शेतीवर झाले, ते आता अधिक गडद आणि गंभीर झाले आहेत. जलवायू परिवर्तन आणि तापमानवाढीचा परिणाम म्हणून पूर आणि अवर्षणाचे संकट शिवारावर गडद होत आहे; मात्र यातून आगामी काळात शेतीचे नुकसान आणखी होण्याची भीती आहे.
वास्तविक पाहता खरिपाच्या पिकाला अवर्षणाचा फटका बसतो, तर रब्बीच्या पिकाने नुकसान भरून काढावे तर तेव्हा अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान करतो. हे दुहेरी चित्र अधिकच गडद होऊ लागले आहे. वातावरणात होत असलेल्या परिवर्तनाचा अनिष्ट परिणाम शेतीवर होत आहे. तापमान आणि पावसात बदल झाल्यामुळे मातीची उत्पादकता कमी होत जाते आणि कीड रोगांचा प्रसार होण्याचा धोका वाढतो. किडींचा फैलाव अधिक वेगाने झाल्यामुळेही उत्पादन घटते.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने या वर्षी सर्वसाधारण पाऊसमान राहील, अशी भविष्यवाणी केली होती; मात्र प्रत्यक्षात सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस झाल्याचे स्पष्ट होते. वाढते प्रदूषण, नैसर्गिक स्रोतांचा अतिउपसा केल्यामुळे पर्यावरणात बदल घडत आहेत. त्याचा शेतीवर आणि पिकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. पावसाळ्याचे दिवस पूर्वी अधिक होते, ते आता कमी झाले आहेत; मात्र कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याच्या घटनांची वारंवारता वाढू लागली आहे.
आता तर एकाच दिवशी अधिक पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा स्थितीत शेतकर्यांची स्थिती कमालीची केविलवाणी होऊ लागली आहे. खरे तर शेतकर्यांना हवामानाची अचूक माहिती वेळेवर मिळणेही गरजेचे आहे. तसे झाले तर थोडेबहुत तरी नुकसान टळू शकते.
पर्यावरणातील अनेक बदल शेतीवर थेट परिणाम करत आहेत. सरासरी तापमानात वाढ हा पहिला बदल होय.
वातावरणाचे तापमान वाढल्यामुळे पिकांच्या उत्पादकतेत घट होत आहे. तापमान अधिक वाढल्यास मका, ज्वारी आणि भात अशा पिकांच्या उत्पादकतेत घट होऊ शकते. कारण या पिकांमध्ये दाणे तयार होण्याची प्रक्रिया विशिष्ट तापमानातच होते. तापमान वाढल्यास दाणे कमी प्रमाणात तयार होऊन उत्पादन घटते. तापमान असेच वाढत राहिल्यास ही पिके घेणे अवघड होऊन बसेल.
अतिरिक्त तापमानवाढीमुळे पावसावर प्रतिकूल परिणाम होतो. पाऊस कमी पडल्यामुळे मातीतील आर्द्रता कमी होते. तापमानवाढीमुळे दुष्काळाची परिस्थिती वारंवार उद्भवते, अंतिमत: त्याचा शेतीलाच फटका बसतो.
पावसाचे प्रमाण आणि स्वरूपात झालेला बदल हाही पिकांवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. पाऊस कमी पडल्यास जमिनीतील ओलावा नष्ट होत जातो, तर एकाच वेळी अधिक पाऊस पडल्यास मातीची धूप होऊन जमीन नापीक होते. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे वनस्पतींवर प्रतिकूल परिणाम होत आहे.
हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे वातावरणात ओझोनच्या थरावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या वायूंच्या उत्सर्जनामुळे ओझोनचा थर पातळ होत आहे, तर रासायनिक खते आणि कीटकनाशके जमिनीच्या उत्पादकतेत घट करणारी ठरत आहेत.
त्यामधील विषारी घटक अन्नसाखळीत समाविष्ट होऊन अन्नावाटे पोटात जाऊन आरोग्याचेही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे रासायनिक शेतीतून हरितगृह वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळे निसर्गाचे चक्र आणखी बिघडते.
वादळ, वारा आणि अतिवृष्टी यामुळे शेतकरी आणि शेती अडचणीत आली आहेत. उदाहरणार्थ सन 2014, 2015 आणि 2018 या वर्षी आपल्याला भीषण दुष्काळाला तोंड द्यावे लागले. पाठोपाठ 2014 आणि 2015 मध्ये गारपिटीचा सामना करावा लागला. 2016, 2019 आणि 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूर आले. कोकण किनारपट्टीवर ‘निसर्ग’ (2020) आणि ‘तौक्ते’ (2021) या चक्रीवादळांचा तडाखा आणि त्याचबरोबर पूर परिस्थितीमुळे या संकटात भरच पडली.
पृथ्वीचे सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस असते; पण जागतिक तापमानवाढीमुळे तापमानातच वाढ होऊ लागली आहे. सन 1906 ते 2000 या 100 वर्षांच्या काळात पृथ्वीचे वार्षिक सरासरी तापमान 0.74 अंश सेल्सिअसने वाढले, तर यातील सर्वात उष्ण अकरा वर्षे ही गेल्या 12 वर्षांतील आहेत, यावरून तापमानवाढीचा वेग लक्षात येण्यास हरकत नसावी. अर्थात याच दरम्यान जागतिक समुद्रपातळीतदेखील 17 सेेंटिमीटरची वाढ झाली आहे. यातूनच सामुद्रिक वादळे होऊन त्याचा पावसावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.