

जत : अहिल्यानगर - विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर मोरबगीनजीक (ता. जत) टेम्पो व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत चालक जागीच ठार झाला आहे. पवन रामचंद्र बुद्रुक (वय 22, रा. वाळूज, ता. मोहोळ जि. सोलापूर) असे नाव अपघातात ठार झालेल्या तरुणाचे आहे. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. महामार्गावर घडलेल्या घटनेमुळे सुमारे दहा किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, पवन बुद्रुक हा टेम्पोने जत तालुक्यातील उमदी-विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. दरम्यान पंढरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्या ट्रकची या टेम्पोस समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता यात टेम्पोचा चक्काचूर झाला. चालक पवन बुद्रुक हा जागीच ठार झाला.
याबाबतची माहिती 112 या टोल फ्री क्रमांकवरून उमदी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक आगतराव मासाळ, सुनील घोडके, नितीन जगदाळे, महादेव मडसनाळ घटनास्थळी हजर झाले. अपघातग्रस्तांना मदत केली. बुद्रक यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. हलगर्जीपणे वाहन चालवल्याने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तमिळनाडू येथील ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलिस करत आहे.