

आटपाडी ः शिक्षकांचे अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रधान सचिवांसोबत लवकरच मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
सांगली शिक्षक समितीचे नेते यु. टी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने गोरे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन दिले. यावेळी आटपाडी येथील मेळाव्यातील प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात आला. 15 मार्च 2024 चा संचमान्यता आदेश, 2001 ते 2014 पर्यंतची वस्ती शाळा शिक्षकांची सेवा ग्राह्य धरण्याबाबत, एमएससीआयटी प्रमाणपत्रास मुदतवाढ, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणे, राज्यभर गुणवत्तेचे दोन ते तीनच उपक्रम राबवून समानता ठेवणे, गत दहा वर्षांपासून 50 टक्के केंद्रप्रमुखांची सरळ सेवेतून पदे भरलेली नाहीत. तरी शिक्षण क्षेत्रातील एम.एड्., एम.ए. एज्युकेशन झालेल्या प्राथमिक शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार संधी देऊन रिक्त पदे भरण्यात यावीत, प्राथमिक शिक्षकांना पूर्वीप्रमाणे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी या पदांची सरळ सेवेतून संधी मिळावी, अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करणे, यासंदर्भात चर्चा झाली.
याप्रश्नी लवकरच शिक्षणमंत्री, प्रधान सचिव ग्रामविकास यांच्यासह बैठक घेऊ, असे गोरे यांनी सांगितले. शिष्टमंडळात सुनील आदलिंगे, नानासाहेब झुरे, सचिन खरमाटे, मधुकर बनसोडे आदींचा समावेश होता.