तासगावात डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

आई, बहिणीच्या कृत्याने खळबळ : आत्महत्येचा बनाव उघडकीस
Tasgaon youth murder
मयूर रामचंद्र माळीpudhari photo
Published on
Updated on

तासगाव : येथील कासार गल्लीत राहावयास असणार्‍या मयूर रामचंद्र माळी (वय 30) या तरुणाचा आई व बहिणीने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. मयूर याने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव आई व बहिणीने केला, पण पोलिसांनी तो उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आई संगीता रामचंद्र माळी व बहीण काजल रामचंद्र माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर हा आई व बहिणीसह येथील कासार गल्लीत राहत होता. त्याचा आई व बहिणीशी सतत वाद होत होता. हे वाद अनेकदा विकोपाला गेले होते. मयूरच्या त्रासाला संगीता आणि काजल वैतागल्या होत्या. त्यातूनच त्या मयूरला धडा शिकविण्याची संधी शोधत होत्या.

शुक्रवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. यातून मयूरचा काटा काढण्याचे ठरवून शुक्रवारी रात्री नऊ वाजता दोघींनी मयूरला जेवणातून गुंगीचे औषध दिले. मयूरला गुंगी आल्यानंतर काही वेळाने त्यांनी मयूरच्या डोक्यात दगड घातला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर मयूरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मयूरने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा बनाव केला. यासाठी त्याच्या अंगावरील कपडे पेटवून दिले. त्यानंतर भाजलेल्या अवस्थेत मयूरला तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर डोक्यात मोठी जखम आढळून आली. यामुळे संशय बळावला आणि खुनाचा प्रकार उघडकीस आला.

मयूर याच्याशी आई संगीता आणि बहीण काजल यांच्या असणार्‍या वादातूनच त्यांनी त्याचा खून करण्यात आल्याची चर्चा आहे. संगीता आणि काजल यांच्याव्यतिरिक्त या खुनात अन्य कोणाचा सहभाग आहे काय? याबाबतही शहरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. मयूर हा नेहमी आई आणि बहिणीला त्रास देत होता, अशीही माहिती समोर येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे तासगाव पोलिसांनी सांगितले.

खुनाचे रहस्य कायम

मयूर हा नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असायचा. दोस्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून तो शहरात विविध उपक्रम राबवित होता. त्यामुळे तो तरुणांच्यात मिळून मिसळून असायचा. शनिवारी दिवसभर याची सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार चर्चा दिसून येत होती. मात्र मयूर याचा नेमका खून कोणत्या कारणाने झाला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत समोर आली नव्हती. सोशल मीडियावर चर्चा मात्र जोरदार रंगली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news