Sangli Crime : तासगावात विद्यार्थ्यांच्या सायकली चोरट्यांच्या निशाण्यावर

शाळांच्या आवारातून सायकली गायब; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
Sangli Crime News
तासगावात विद्यार्थ्यांच्या सायकली चोरट्यांच्या निशाण्यावर
Published on: 
Updated on: 

तासगाव : शहरात शाळांच्या आवारातून तसेच शहर परिसरातून विद्यार्थ्यांच्या सायकली चोरीला जाण्याचे प्रकार वाढत असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिक्षणासाठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सायकलीच सुरक्षित नसतील, तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येणार नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी तासगाव पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सायकली चोरून त्यांची परस्पर विक्री केली जाते किंवा भंगारात घातली जाते, असे दिसून आले आहे. या प्रकारांमागे नेमके कोण आहे, चोरीच्या सायकली कुठे जातात आणि त्यांची खरेदी-विक्री कोण करत आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे.

तासगाव पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन शाळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, नियमित गस्त वाढवावी आणि सायकलींची चोरी करणाऱ्यांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भंगार व्यावसायिकांकडे संशयास्पद सायकलींची तपासणी करणे आणि चोरीच्या सायकलींची विक्री रोखण्यासाठी ठोस पावले उचलणेही आवश्यक आहे. चोरीच्या घटना घडल्यानंतर तक्रारींची वाट पाहण्याऐवजी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सायकली चोरणाऱ्यांना कायद्याचा धाक कधी बसणार? चोरीच्या सायकलींचा शोध कधी लागणार? शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी तासगाव पोलिस नेमकी कोणती ठोस कारवाई करणार? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

‘तो’ भंगारवाला संशयाच्या भोवऱ्यात

दरम्यान, अशा चोरीच्या वस्तू खरेदी करण्यात तासगावचा एक भंगारवाला चर्चेत आहे. या भंगारवाल्याने काही वर्षांपूर्वी पोलिसांनी स्क्रॅपमध्ये काढलेल्या दुचाकी विकण्याचा पराक्रमही केला होता. तसेच नुकत्याच तासगाव येथील सूतगिरणीमध्ये झालेल्या चोरीतील वस्तूही त्यानेच खरेदी केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या सायकल चोरीमध्येही हीच व्यक्ती पुढे असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news