

तासगाव : येथील कांबळेवाडी या उपनगरात राहावयास असलेल्या कांबळे कुटुंबात वादातून चिडून दारूड्या मुलाने केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा संतोष सुधाकर कांबळे (वय 45) याला अटक केली आहे. सुधाकर तुकाराम कांबळे (70) असे मृताचे नाव आहे. रात्री उशिरा मृत सुधाकर यांची पुतणी सुनीता अशोक कांबळे (40) यांनी फिर्याद दाखल केली आहे. खुनाचा गुन्हा नोंद झाला.
सुधाकर आणि संतोष मजुरी करून कुटुंब चालवत होते. पण दोघांनाही दारूचे व्यसन. त्यांच्यात दररोज वाद, मारहाण होत असे. संशयित संतोष हा दररोज दारू पिऊन वडिलांना मारहाण करीत असे. शेजारील, भावकीतील लोकांनी अनेकवेळा या कुटुंबातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही.
संतोष याचा विवाह वाळेखिंडी (ता. जत) येथील मुलीशी झाला होता. मात्र संतोषच्या त्रासाला कंटाळून पत्नी सहा वर्षांपासून माहेरी निघून गेली आहे. रविवारी तो दारू पिऊन सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्याने त्यावेळेपासून वडिलांशी वाद सुरू करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. वडील सुधाकर यांची प्रकृती साधारण असल्याने ते संतोष याला प्रतिकार करू शकले नाहीत. त्याची आईही मारहाणीच्या भीतीने परिसरातील घरात जाऊन बसली होती. संतोष हा दुपारी चार वाजेपर्यंत अधुन-मधून वडिलांना निर्दयीपणे लाथा व ठोसे मारत होता. अनेक वेळा त्याने वडिलांच्या छातीवर लाथांनी मारहाण केली. मारहाणीत सुधाकर यांच्या डोक्यास व तोंडावर गंभीर जखम झाली होती. मारहाणीने काही वेळ सुधाकर जमिनीवर पडून राहिले. त्यावेळी सुधाकर यांच्या पत्नीने त्यांना दोन केळी खायला दिली. केळी खाऊन ते घरातच पडून राहिले. रात्री उशिरा सुधाकर यांना पत्नीने जेवण करण्यासाठी उठविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी नकार देऊन ते तसेच पडून राहिले. मात्र सकाळी पत्नी सुधाकर यांना उठविण्यास गेल्या असता, ते मृत झाल्याचे दिसले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी तानाजी पाटील यांनी प्राथमिक तपासणी केली असता सुधाकर यांच्या डोक्याच्या मागच्या भागाला गंभीर दुखापत दिसून आली. चेहर्यावरील दोन्ही डोळ्यांशेजारी जखम आढळून आल्याचे डॉक्टरांना शंका आल्याने मृतदेह अधिक तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
तू माझ्यासाठी काय मिळवून ठेवलयास, तुझ्यामुळे मी भिकारी झालो, असे म्हणून संतोष हा वडील सुधाकर यांना मारहाण करायचा, अशी माहिती मिळाली.