Tasgaon multispeciality hospital: तासगावात सहा कोटींचे मल्टिस्पेशालिटी ‘धूळ खात’

वैद्यकीय सेवांअभावी रुग्णालय कुचकामी; नेतेमंडळी गांधारीच्या भूमिकेत
Tasgaon multispeciality hospital: तासगावात सहा कोटींचे मल्टिस्पेशालिटी ‘धूळ खात’
Published on
Updated on
प्रमोद चव्हाण

तासगाव : शहरातील सर्वसामान्य रुग्णांची सोय व्हावी, यासाठी तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले कस्तुरबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सध्या वैद्यकीय सेवांअभावी धूळ खात पडले आहे. कोरोना काळात या ठिकाणी कोविड सेंटर उभारून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

ऑक्सिजन टँक, शंभरहून अधिक बेड आणि अन्य सुविधांसह तीन मजली सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, लोकार्पण होऊन चार वर्षे उलटूनही येथे सर्वसामान्यांसाठी नियमित वैद्यकीय सेवा सुरू झालेल्या नाहीत. सध्या या ठिकाणी केवळ मिरज शासकीय रुग्णालयाचे आरोग्य शिक्षण पथक कार्यरत आहे. रुग्णालयातील कोट्यवधी रुपयांचे साहित्य वापराअभावी खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रुग्णालय सुरू झाल्यानंतर चार वर्षांचा कालावधी उलटला असतानाही येथे आवश्यक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि उपचाराच्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. सुमारे सहा महिन्यांपूर्वी आमदार रोहित पाटील यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी येथे डायलेसिस सेंटर तसेच शासकीय रक्तपेढी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर या सुविधांबाबत ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

जनतेच्‍या प्रश्नांकडे दुर्लक्ष

तासगाव तालुक्यातून जाणारा महामार्ग असो किंवा रिंगरोड; या दोन्ही रस्त्यांच्या श्रेयावरून आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांचे गट एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आणि अत्यावश्यक प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची परिस्थिती आहे. दोन्ही नेते जनतेच्या मूलभूत प्रश्नांबाबत मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news